रत्नागिरी : हनुमान जयंतीनिमित्त रत्नागिरी शहरात गुरुवारी मारुती आळीपासून मच्छी मार्केटजवळील पारावरच्या हनुमान मंदिरापर्यंत काढण्यात आलेल्या रथोत्सव देखावा मिरवणुकीमुळे रत्नागिरीकरांना हनुमानाच्या श्रीराम भक्तीची अनुभूती घेता आली. शहरातून सायंकाळी काढण्यात आलेल्या या मिरवणुकीमुळे शहरातील वातावरण भक्तीमय झालेले पाहायला मिळाले.
हनुमान जयंतीनिमित्त रत्नागिरीतील श्री मारुती मंदिर संस्थेतर्फे हनुमान जयंतीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. हनुमान जयंतीनिमित्त शहरातील आळीतील हनुमान मंदिरासह इतर हनुमान मंदिरांमध्ये भाविकांनी गुरुवारी दर्शनासाठी गर्दी केली होती.
श्री मारुती मंदिर संस्थेतर्फे गुरुवारी सायंकाळी मारुती आळीपासून मच्छी मार्केट येथील पारावरच्या हनुमान मंदिर मार्गे रथोत्सव यात्रा करण्यात आली. श्री हनुमान च्या प्रभू रामचंद्रांवरील भक्तीवर आधारित विविध देखावे मिरवणुकीत सहभागी झाले होते. शहरातून काढण्यात आलेल्या मिरवणुकीमध्ये श्री रामाच्या रथाचा श बजरंग बली हनुमान, श्री गणपती आधी देवतांचे देखावे साकारण्यात आले होते. मिरवणुकीच्या मार्गावर नागरिकांनी देखाव्यात सहभागी झालेल्या कलाकारांसमवेत सेल्फी काढल्या. रथोत्सवामध्ये सहभागी झालेल्या श्रीराम तसेच बजरंग बली श्री हनुमानाचे सुहासिनी तसेच नागरिकांनी मनोभावे दर्शन घेतले.



















