वसई : पश्चिम रेल्वेच्या वसई स्थानकावरून रत्नागिरी- सावंतवाडीपर्यंत थेट रेल्वे गाडी सुरू व्हावी, यासाठी वसई विरारसह मुंबईच्या पश्चिम उपनगरात राहणाऱ्या प्रवासी संघटना तसेच नोकरी व्यवसायानिमित्त मुंबईत स्थायिक झालेल्या कोकणवासीयांनी पुन्हा एकदा पुढाकार घेतला आहे.
यापूर्वी गणेशोत्सवासारख्या हंगामात वांद्रे-वसई स्टेशनवरून सावंतवाडीला येणारी विशेष गाडी सुरू करण्यात आली होती. मुंबईतील पश्चिम उपनगरासह वसई विरारमध्ये राहणाऱ्या कोकण वासियांची मोठ्या प्रमाणावरील संख्या लक्षात घेता वसईवरून थेट कोकण रेल्वे मार्गावर रत्नागिरी किंवा सावंतवाडी पर्यंत जाणारी एक्सप्रेस गाडी सुरू करावी, अशी मागणी मागील काही वर्षांपासून करण्यात येत होती. तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या काळात हंगामी काळाप्रती सुरू करण्यात आलेली ही गाडी पुढे कायमस्वरूपी करण्यासंदर्भात हालचाली देखील सुरू झाल्या होत्या. मात्र नंतरच्या काळात रेल्वेने वसई स्थानकावरून गाडी सोडण्यातील अडचणी पुढे करून ही गाडी सुरू करण्यासाठी जोरदार सुरू झालेल्या हालचालींना खीळ बसवली.
मुंबईतील पश्चिम उपनगरातून मुंबई सेंट्रल किंवा वांद्रे येथून कोकण रेल्वे मार्गावर येणारी गाडी सोडल्यास वसई येथे इंजिन रिव्हर्स घेण्याचा द्राविडी प्राणायाम करावा लागत असल्यामुळे रेल्वेने कोकणात येण्यासाठी मुंबईतून गाडी सोडणे ऐवजी गुजरातमधील सुरत, अहमदाबाद किंवा अलीकडच्या काळात सुरतजवळील उधना जंक्शन वरून कोकण रेल्वे मार्गावर केवळ हंगामा पुरत्या विशेष गाड्या सोडण्याचा पर्याय निवडला. त्यामुळे मधल्या काळात सावंतवाडीकडे येणाऱ्या कायमस्वरूपी रेल्वे गाडीचा विषय मागे पडला.
दरम्यान, आता पुन्हा एकदा मुंबईतील कोकणवासियांनी वसईतून थेट कोकण रेल्वे मार्गावर येणाऱ्या गाडीसाठी आग्रह धरला आहे. यासाठी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्यासह वसई पालघर डहाणू मधील लोकप्रतिनिधी, मुंबईतील लोकप्रतिनिधीसह कोकणातील लोकप्रतिनिधींना सोबत घेऊन वसई हून थेट कोकण रेल्वे मार्गावर येणाऱ्या गाडीसाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. चालू उन्हाळी हंगामात ही गाडी कशी सुरू होईल, यासाठी रेल्वे प्रवासी संघटना तसेच मुंबईतील कोकणवासीय आग्रही आहेत.















