मडगाव तेजस एक्सप्रेस डबल विस्टा डोम कोच असलेली देशातील पहिली ट्रेन!

रत्नागिरी : पर्यटकांसाठी पूरक असा पारदर्शक काचांनी युक्त वातानुकलीत पहिला विस्टा डोम कोच पहिल्यांदा कोकण रेल्वे मार्गावरील मुंबई ते गोवा मार्गावर धावणाऱ्या जनशताब्दी एक्सप्रेसला जोडण्यात आला होता. या विक्रमापाठोपाठ आता याच मार्गावरील तेजस एक्सप्रेसने देशातील दोन विस्टाडोम कोच असलेली पहिली ट्रेन होण्याचा मान मिळवला आहे. दरम्यान, चेअरकारच्या तुलनेत मुंबई ते गोव्यापर्यंतचे विस्टा डोम कोचसाठी जवळपास दुप्पट तिकीट असतानाही १४ एप्रिलला दोन विस्टा डोम डब्यांसह धावणारी पहिली तेजस एक्सप्रेस हाऊसफुल्ल झाली असून बुधवारी रात्रीच या कोचसाठी प्रतीक्षा यादीवरील तिकिटांची विक्री सुरु झाली होती.

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मडगाव दरम्यान धावणाऱ्या तेजस एक्सप्रेसला आणखी एक विस्टाडोम कोच दि. १४ एप्रिलपासून कायमस्वरूपी जोडण्यात येणार आहे. मुंबई- गोवा प्रवासादरम्यान पर्यटक तसेच प्रवाशांची विस्टाडोम कोचला असलेली वाढती पसंती लक्षात घेऊन रेल्वेने हा निर्णय घेतला आहे.

कोकण रेल्वे मार्गावर धावणारी जनशताब्दी एक्सप्रेस तसेच 22119 /22120 या तेजस एक्सप्रेसला प्रत्येकी एक पर्यटक पूरक कोच म्हणजेच पारदर्शक काचांनी युक्त असलेला डबा जोडण्यात आला आहे. या कोचमधून प्रवास करणाऱ्या पर्यटक तसेच प्रवाशांना रेल्वे प्रवासादरम्यान कोकणचे सौंदर्य न्याहाळणे, कॅमेरे तसेच मोबाईलमध्ये टिपणे सोपे झाले आहे. गरजेनुसार फिरवता येणारी आसने, काचांनीयुक्त पारदर्शक छत तसेच कोचच्या खिडक्यांना असलेल्या प्रशस्त काचा यामुळे कोकण रेल्वे मार्गावर जाणाऱ्या जनशताब्दी तसेच तेजस एक्सप्रेसला जोडलेल्या विस्टाडोम कोचला प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.

तेजस एक्सप्रेसला लावत असलेला प्रतिसाद लक्षात घेऊन आता दिनांक 14 एप्रिल 2023 पासून आणखी एक विस्टाडोम कोच जोडण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे. यामुळे आता तेजस एक्सप्रेस एकूण दोन विस्टाडोम कोचसह धावणार आहे.

वाढीव विस्टाडोम कोचमुळे मुंबईतील छत्रपती शिवाजी टर्मिनस ते मडगाव- मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस (22119/22120) ही गाडी आता पंधरा ऐवजी 16 एलएचबी डब्यांची धावणार आहे. देशात विविध मार्गावर धावत असलेले विस्टाडोम रेल्वेच्या तिजोरीत चांगली भर घालत असल्याचे निदर्शनास आले.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE