
रत्नागिरी : मुंबई- गोवा महामार्गाचे काम पूर्ण झाल्याशिवाय टोल वसुली केली जाऊ नये अशी स्थानिकांची भूमिका असताना 11 एप्रिल रोजी राजापूर नजीक हातिवले येथील टोल नाक्यावर अचानक पोलीस बंदोबस्तात टोल वसुली सुरू झाली खरी मात्र विरोधाच्या पार्श्वभूमीवर 14 एप्रिल रोजी बैठक होईपर्यंत ती स्थगित देखील करण्यात आली.
मुंबई गोवा महामार्गावर हातिवले येथे उभारण्यात आलेल्या टोल प्लाझावर याआधी दोन वेळा संबंधित ठेकेदार कंपनीकडून टोल वसुलीचा प्रयत्न झाला होता. मात्र वाहनधारक तसेच स्थानिकांच्या प्रखर विरोधामुळे आणि सर्वच राजकीय पक्ष पक्षांनी रस्त्यावर उतरत आक्रमक पवित्रा घेतल्यामुळे डिसेंबरपासून राजापूरमधील टोल वसुली बंदच होती.
महामार्गावरील टोल वसुली संदर्भात विरोधाची पार्श्वभूमी असताना 11 एप्रिल रोजी अचानक पोलीस बंदोबस्तात येथील टोल प्लाझावर टोल वसुली सुरू करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर बुधवारी विरोध कर्त्या रहिवाशांनी पालकमंत्री उदय सामंत यांची रत्नागिरी येथे भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. यावेळी पालकमंत्र्यांनी दिनांक 14 एप्रिल रोजी अधिकाऱ्यांसोबत या संदर्भात बैठक घेण्याचे रहिवाशांना आश्वासन देत तोपर्यंत टोल वसुलीला स्थगिती दिली आहे. त्यामुळे मंगळवारी सुरू झाली टोल वसुली बुधवारपासून स्थगित करण्यात आली आहे.
दरम्यान आता यासंदर्भात 14 रोजीच्या बैठकीत नेमका काय निर्णय होतो याकडे वाहणाऱ्या प्रत्येक रहिवाशांचे लक्ष लागले आहे.














