निवसरमध्ये कोकण रेल्वेची वाहतूक खोळंबली

रेल्वे बोगद्यात पसरलेल्या धुरामुळे मंगला एक्सप्रेससह सहा ते सात गाड्यांना विलंब

रत्नागिरी : रेल्वे मार्गालगत जळण्यात आलेल्या कचऱ्याचा धूर लगतच्या रेल्वे टनेलमध्ये पसरल्यामुळे कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या डाऊन मंगला तसेच अप सावंतवाडी दिवा एक्सप्रेससह याचवेळी या मार्गावरून धावणाऱ्या सहा ते सात एक्सप्रेस गाड्यांना विलंबाचा फटका बसला. दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास घटना घडली. दरम्यान, दुपारी पावणे तीन वाजण्याच्या सुमारास खोळंबेली वाहतूक सुरळीत करण्यात रेल्वेला यश आले.

कोकण रेल्वे मार्गावर निवसर स्थानकानजीक असलेल्या टनेलजवळ जाळण्यात आलेल्या कचऱ्याचा धूर येथे जवळच असलेल्या रेल्वेच्या टनेलमध्ये पसरला. याचदरम्यान घटनास्थळावरून मंगला एक्सप्रेस जात होती. धुराची झळ बसल्याने मंगला एक्सप्रेससह त्याचवेळी त्या भागातून अप दिशेने जाणारी दिवा सावंतवाडी एक्सप्रेस देखील अडकून पडली. या दोन गाड्यांच्या पाठोपाठ दोन्ही बाजूंनी येणाऱ्या अन्य चार एक्सप्रेस गाड्यांना याचा फटका बसला.

या एक्सप्रेस गाड्यांना बसला विलंबाचा फटका

एर्नाकुलम-एलटीटी दुरंतो एक्सप्रेस, मडगाव -निजामुद्दीन राजधानी एक्सप्रेस, मडगाव -सीएसएमटी मांडवी एक्सप्रेस, अप दिशेने धावणारी मरूसागर एक्सप्रेस, दिवा- सावंतवाडी एक्सप्रेस, सीएसएमटी -मडगाव मांडवी एक्सप्रेस, अमृतसर- कोचुवेली एक्सप्रेस या गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम झाला. निवसरमधील या घटनेमुळे या सर्व गाड्या त्यांच्या निर्धारित वेळेपेक्षा विलंबाने धावत होत्या.

ही घटना घडलेले ठिकाण रत्नागिरीजवळच घटनेची माहिती मिळताच रत्नागिरी येथील क्षेत्रीय रेल्वे प्रबंधक कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी तातडीने घटनास्थळी रवाना झाले. रेल्वेकडून पुढील काही वेळातच खोळंबलेली वाहतूक पूर्ववत करण्यात आली.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE