मलप्पुरम ( केरळ ) : सध्या लोक हज यात्रेला निघाले आहेत. या धार्मिक यात्रेत सहभागी होण्यासाठी भारतातून जवळपास १७५००० लोक मक्का येथे पोहोचणार आहेत. दि.२१ मे पासून हा प्रवास सुरू झाला आहे. केरळमधील शिहाब छोटूर या तरुणाने मक्का येथे पायी जाण्याचा निर्णय घेतला. हा खूप कठीण निर्णय होता. कारण भारतापासून मक्का हे अंतर ८६४० किलोमीटर होते.
सुमारे ३७० दिवस त्याने प्रवास पूर्ण करून मक्का गाठले. पाकिस्तान, इराण, इराक, कुवेतमार्गे तो सौदी अरेबियात पोहोचला. केरळमधील मलप्पुरम जिल्ह्यातील वलनचेरी येथील रहिवासी शिहाब छोत्तूर हा मक्का येथे जाण्यासाठी २ जून २०२२ रोजी घरातून निघाला. यानंतर प्रवासात अनेक थांबे घेत तो मक्का येथे पोहोचला. सौदीला पोहोचल्यानंतर शिहाबने इस्लामचे सर्वात महत्त्वाचे तीर्थक्षेत्र मदिना गाठले. येथे त्याने २१ दिवस घालवले.
शिहाबने नऊ दिवसांत मक्का आणि मदिना दरम्यानचे ४४० किलोमीटरचे अंतर कापले. पाकिस्तानने धार्मिक यात्रेतही अडथळे निर्माण केले. ट्रान्झिट व्हिसाच्या नावाखाली शिहाबला एका शाळेत ठेवले होते. शिहाब आपली आई झैनाबा सौदीला पोहोचल्यानंतर हज करणार आहे.
दरम्यान, केरळचा शिहाब स्वतःचे यूट्यूब चॅनलही चालवतो. दररोज तो आपला प्रवासही प्रेक्षकांना सांगत गेला.
गेल्या वर्षी जूनमध्ये हज यात्रा सुरू केल्यानंतर, शिहाब वाघा सीमेवर पोहोचण्यापूर्वी देशातील अनेक राज्यांमधून गेला. वाघा बॉर्डरवरून त्याला पाकिस्तानात प्रवेश करायचा होता, पण पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी त्याला रोखले. कारण शिहाबकडे व्हिसा नव्हता. शिहाबला ट्रान्झिट व्हिसा मिळण्यासाठी महिनाभर शाळेत थांबावे लागले. फेब्रुवारी २०२३ मध्ये शिहाबला ट्रान्झिट व्हिसा मिळाला. यानंतर त्याने पुन्हा प्रवास सुरू केला आणि चार महिन्यांनी आपल्या गंतव्यस्थानी पोहोचला.















