सोहळ्यानिमित्त पुस्तकाचे प्रकाशन
संगमेश्वर : रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यामधील सांगवे ही जन्मभूमी आणि शिवने ही कर्मभूमी असलेले निवृत्त पोलीस उपनिरिक्षक कै. दत्ताराम लक्ष्मण पवार यांची जन्मशताब्दी पवार कुटुंबीयांतर्फे नुकतीच मुंबई येथे साजरी करण्यात आली. कै. पवार यांनी मुंबई पोलीस दलात ३७ वर्षे सेवा करुन एक प्रामाणिक आणि कर्तव्यनिष्ठ अधिकारी म्हणून नावलौकीक मिळवला होता. त्यांनी सेवानिवृत्तीनंतर आपले गो सेवा आणि शेतीचे छंद जोपासत शिवने गावचे सरपंच पदही भूषवले होते.
शिवने आणि सांगवे गावासाठी त्यांनी अनेक लोकाभिमुख कामे केली. अशा या आपल्या वडीलांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांच्या मुलांनी सर्व पवार कुटुंबाला एकत्र करुन नातेवाईक आणि मित्र परिवाराच्या साथीने वडिलांचा जन्मशताब्दी सोहळा नुकताच साजरा केला. त्यानिमित्ताने त्यांच्या आठवणींचा संग्रह असलेले तीर्थरुप या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. त्यांची छोटी कन्या स्नेहल आयरे यांनी रचलेल्या जन्मशताब्दी गीताचे अनावरण करण्यात आले.
हा कार्यक्रम प्रसिध्द उद्योजक शिवनाथ हरियन, सुप्रसिध्द गायक आणि संगीतकार संजय पंडित, राजापूर लांजा तालुका नागरिक संघाचे अध्यक्ष सुभाष लाड आदि मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
आपल्या मनोगतात शिवनाथ हरियन यांनी पवार कुटुंबाला १५ वर्षांपासून ओळखत असल्याचे सांगितले . पवार यांनी मुलांच्या रुपात चांगले बीज पेरले असल्याचे नमूद करुन पवार कुटुंबीयांनी आपल्या वडिलांच्या शंभर वर्षानंतर देखील जन्मशताब्दी निमित्त त्यांच्या स्मृतींना उजाळा देवून सर्वांची मने जिंकली आहेत . संजय पंडित यांनी आपल्या मनोगतात पवार यांनी आपल्या कुटुंबाला कसे संस्कारीत केले , त्याचे हा सोहळा म्हणजे जीवंत उदाहरण असल्याचे नमूद केले.सुभाष लाड यांनी आपल्या मनोगतात , मी जेथे जाईन तेथे या कार्यक्रमाचे उदाहरण देइन असे अभिमानाने सांगितले .
या कार्यक्रमाला कै . दत्ताराम पवार यांची मुले , नातवंडे , जावई , सुना , नातेवाईक , ग्रामस्थ यांनी त्यांच्या आठवणी सांगितल्या . कै . पवार यांचे कनिष्ठ पुत्र आणि शिवने गावचे सरपंच मारुती पवार या उभयतांनी आई वडिलांच्या केलेल्या सेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्नेहल आयरे आणि शरयू देसाई यांनी केले . प्रास्ताविक व आभार प्रदर्शन डॉ . चंद्रकांत पवार यांनी केले .














