संगमेश्वर दि . १५ ( प्रतिनिधी ): उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर फक्त विदर्भ वगळून आज दिनांक १५ जून २०२३ रोजी सर्व शाळा महाराष्ट्रात सुरू होत आहेत. ” मुलं म्हणजे देवाघरची फुलं ” असे म्हटले ते खरेच आहे. मूल शाळेत आले तरच मुल शिकेल, शाळा सुद्धा चालेल. नाहीतर शाळा केवळ भिंतींच्या बघायला मिळतील. म्हणून प्रत्येक मूल शाळेत येणे गरजेचे आहे, आणि गुणवत्ता पूर्ण विकास झाला पाहिजे, हेही तितकेच महत्त्वाचे आहे. आजचे शिक्षण हे विद्यार्थी केंद्रित शिक्षण असून विद्यार्थी हा प्रार्थमिक शिक्षणाचा केंद्रबिंदू मानून त्याचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे. व आदर्श नागरिक होण्यासाठी अधिनियम२००९ नुसार मुलांनी आनंदी वातावरणात ,हसत, खेळत शिकणे हीच शिक्षण हक्क कायद्याची फलनिष्पत्ती आहे. प्रत्येक मुलाने नियमित शाळेत यावे. यासाठी राज्यभर विविध उपक्रम आयोजित केले जातात, तसेच नवीन शाळा प्रवेश म्हणजे मुलांसाठी एक अनोखा आनंदोत्सव जणू असतो.अशा प्रकारचे माहितीपूर्ण मार्गदर्शन कडवई प्रभागाचे शिक्षण विस्तार अधिकारी मा. विनायक पाध्ये यांनी शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रमात शाळा गोळवली टप्पा तालुका संगमेश्वर येथे केले.
शाळेत उपस्थित असलेल्या नवीन प्रवेश घेणाऱ्या व इतर सर्व मुलांचे स्वागत गुलाब पुष्प देऊन, तसेच प्राप्त झालेल्या पाठ्यपुस्तकांचेही वितरण श्रीयुत पाध्ये साहेब यांच्या शुभहस्ते करण्यात आले. व मुलांना खाऊ वाटपही करण्यात आला. शाळेचा वर्ग फुले, फुगे, रांगोळी काढून सजवण्यात आला होता. मुलांचे चेहरे आनंदोत्सवाला दाद देत होते. पालकवर्ग खुश होता. नियोजन शिक्षिका सौ. श्वेता खातू व सारीका सानप यांनी केले होते.
या प्रसंगी अध्यक्षा सौ. अर्चना किंजळकर, स्नेहल किंजलकर, खुशी मसुरकर, दीप्ती किंजळकर, मयुरी किंजळकर, ज्योती साबळे, सविता पोमेंडकर, प्राची पानवलकर आदि उपस्थित होते .














