रत्नागिरी : ओडिशामधील भीषण रेल्वे दुर्घटनेमुळे दि. 3 जून रोजी मडगावमध्ये होणारे उद्घाटन रद्द झालेली मुंबई -मडगाव वंदे भारत एक्सप्रेस अजूनही मुंबईतील वाडीबंदर यार्डातच उभी आहे. मात्र, आता रेल्वे मंत्रालयाच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार येत्या आठवडाभरातच रखडलेल्या मुंबई मडगाव वंदे भारतसह अजून चार मार्गावरील वंदे भारत एक्सप्रेसला पंतप्रधान नरेंद्र मोदी हिरवा झेंडा दाखवून उद्घाटन करणार आहेत. पंतप्रधानांच्या विदेश दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर या गाड्यांना दिनांक 26 की 27 जून रोजी हिरवा झेंडा दाखवला जातो, याची प्रतीक्षा बाकी आहे. या गाड्यांच्या रेल्वे कडून होणाऱ्या अधिकृत घोषणाकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

कोकणवासीय ज्या बहुचर्चित रेल्वेची प्रतिक्षा करत होते, ती आता संपली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 26 जून रोजी एकाच वेळी पाच वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. मात्र पंतप्रधानांचा विदेश दौरा याच कालावधीत असल्यामुळे या पाचही गाड्यांना नेमका दिनांक 26 की 27 जून रोजी हिरवा झेंडा दाखवला जातो याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.
वंदे भारत एक्सप्रेसचबाबत प्राप्त माहितीनुसार धावण्यासाठी सज्ज असलेल्या मडगांव -मुंबई, पाटणा-रांची, भोपाळ-इंदूर, भोपाळ-जबलपूर आणि बेंगळुरू-हुबळी-धारवाड या पाच रेल्वे २६ किंवा २७ जूनपासून धावणार आहे. या नवीन गाड्या सुरू झाल्यानंतर देशातील रेल्वे नेटवर्कवर धावणाऱ्या वंदे भारत गाड्यांची एकूण संख्या 23 होईल. या गाड्यांच्या समावेशामुळे या शहरांतील रहिवाशांना अधिक सोयीसुविधा उपलब्ध होतील, त्यांना आरामदायी आणि आधुनिक वाहतुकीचे साधन उपलब्ध होणार आहे.
मुंबई -मडगाव वंदे भारत एक्सप्रेसचे संभाव्य वेळापत्रक
रेल्वेच्या म्हणण्यानुसार, ही ट्रेन आठवड्यातून 6 दिवस धावेल, तिची सेवा शुक्रवारी बंद असेल. जर तुम्हाला मुंबईहून गोव्याला जायचे असेल तर ही गाडी पहाटे ५.२५ वाजता सुटेल. दुपारी १.१५ वाजता गोव्याला पोहोचेल. ही गाडी गोव्याहून दुपारी २.३५ वाजता सुटून रात्री १०.२५ वाजता पोहोचेल. दादर, ठाणे, पनवेल, खेड, रत्नागिरी, कणकवली या स्थानकावरही ती थांबणार आहे.
