रत्नागिरी, दि.१ : करबुडे गावच्या विकास कामांना निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही देतानाच महिनाभरात आणखी एक कोटीचा निधी जिल्हा नियोजनमधून देण्याची घोषणा पालकमंत्री उदय सामंत यांनी केली.
करबुडे येथील विविध विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटन पालकमंत्र्यांच्या हस्ते आज करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डाॕ. बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.
पालकमंत्री श्री. सामंत म्हणाले, करबुडे गावच्या विकासासाठी मागाल ती कामे मंजूर केली जातील. एकही काम मागे ठेवणार नाही. आपण विकासाचा आराखडा तयार करा. महिनाभरात आणखी १ कोटीचा निधी दिला जाईल, असेही ते म्हणाले.
सरपंच संस्कृती पाचकुडे यांनी सर्वांचे आभार मानले. गटविकास अधिकारी जे. पी. जाधव, रत्नागिरीचे माजी नगराध्यक्ष राहुल पंडित, माजी जि. प. सदस्य बाबू म्हाप, प्रविण पांचाळ, शंकर सोनवणकर, मिलिंद खानविलकर आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.














