रत्नागिरी : खो-खो मधील उत्तुंग कामगिरीबद्दल एकाच वेळी शिवछत्रपती पुरस्काराने राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते गौरव करण्यात आलेल्या रत्नागिरीच्या दोन कन्या अपेक्षा सुतार तसेच आरती कांबळे या खो-खोपटूंची मंगळवारी सायंकाळी रत्नागिरी शहरातून अत्यंत जल्लोषात मिरवणूक काढण्यात आली.
खो खोपटू आरती कांबळे तसेच अपेक्षा सुतार या रत्नागिरीच्या दोन कन्यांना शासनाचा शिवछत्रपती पुरस्कार अलीकडे जाहीर झाला होता. या पुरस्काराचे वितरण पुण्यात सोमवारी राज्याचे राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच अजित पवार यांच्या उपस्थित झालेल्या सोहळ्यात करण्यात आले. रत्नागिरीच्या क्रीडा क्षेत्रात हे दोन मानाचे पुरस्कार एकाच वेळी मिळवल्याने रत्नागिरीच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.
खो खोपटू आरती कांबळे तसेच अपेक्षा सुतार यांच्या या यशाबद्दल तसेच राज्य शासनाकडून मानाचा पुरस्कार देऊन गौरव झाल्याप्रित्यर्थ रत्नागिरी शहरात मंगळवारी सायंकाळी त्यांची जोरदार मिरवणूक करण्यात आली. मिरवणुकीच्या मार्गावर नागरिकांनी रत्नागिरीच्या या दोन्ही खो खो पटू कन्यांचे स्वागत केले.
