चिपळूण : येथीलं लोटिस्माच्या कलादालनात सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती आणि कोकणचे सुपुत्र उदय लळीत यांच्या तैलचित्राचे नुकतेच अनावरण करण्यात आले. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती श्रीराम मोडक यांचे हस्ते झालेल्या अनावरण समारंभाला रत्नागिरीचे ज्येष्ठ विधिज्ञ बाबासाहेब परुळेकर अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. न्यायमूर्ती उदय लळीत यांचे मूळगाव विजयदूर्ग जवळचे गिर्ये आहे. त्यांचे आजोबा सोलापूर येथे वकील होते.
न्यायमूर्ती श्रीराम मोडक हेही मूळ दापोली तालुक्यातील पंचनदी या गावातील आहेत. एका कोकणच्या सुपुत्राचे तैलचित्र कोकणच्याच न्यायमूर्तींच्या हस्ते अनावरण करण्याचा हा समारंभ होता. यावेळी बोलताना न्यायमूर्ती मोडक यांनी बोलताना, केवळ ७४ दिवसांचा कालावधी मिळूनही न्यायमूर्ती लळीत यांनी घेतलेल्या अनेक महत्वाच्या निर्णयांची माहिती दिली. विशेष म्हणजे पतीपत्नी दोन वेगवेगळ्या प्रांतातील असतील तर त्यांच्या घटास्फोटासाठी सर्वोच्च न्यायालयात जावे लागत होते. लळीत यांनी हे अधिकार प्रांताच्या उच्च न्यायालयाकडे सुपूर्द केल्याने वर्षानुवर्ष रखडलेले घटस्फोट सुकर झाले.
सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींची संख्या कमी असल्याने अनेक खटल्यांच्या फक्त तारखा दिल्या जातात. या सर्व खटल्यांचे विकेंद्रीकरण करून वाटप केल्याने सर्वोच्च न्यायालयाचा कामाचा ताण कमी करण्याचा प्रयत्न केला. न्यायमूर्ती लळीत यांच्या तैलचित्राचे अनावरण करण्याचे मला भाग्य लाभले याचा विशेष आनंद वाटतो, अशा शब्दात न्या. मोडक यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
कार्यक्रमाचे अध्यक्ष बाबासाहेब परुळेकर यांनी न्या. ललित यांच्या प्रमाणेच न्या. श्रीराम मोडक हेही न्यायतत्पर अधिकारी असल्याचे नमूद केले. मोडक यांनी घेतलेले अनेक निर्णय महत्वाचे आहेत. न्यायालयीन कामावर त्याचे सकारात्मक परिणाम होणार असल्याचे सांगितले. लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराचे कलादालन हे संपूर्ण कोकणाला भूषणावह आहे. लळीत यांच्या तैलचित्रामुळे हे कलादालन अधिक समृद्ध झाले आहे. २०१३ लोटिस्माने घेतलेल्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या मंडप उभारणीचे काम करणारे प्रभाकर गोखले यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्याध्यक्ष धनंजय चितळे यांनी केले. सूत्रसंचालन श्रीमती मनिषा दामले तर आभार कार्यवाह विनायक ओक यांनी मानले.
- हे देखील वाचा : Konkan Railway | दिवा- रत्नागिरी मेमू स्पेशल ट्रेनला आणखी दोन थांबे
- Konkan Railway | गणेशोत्सवात चिपळूणसाठी स्वतंत्र मेमू स्पेशल गाडी धावणार!
- Konkan Railway | गणेशोत्सवासाठी दिवा-रत्नागिरी मार्गावर यंदा प्रथमच मेमू स्पेशल धावणार!
