रत्नागिरी : शहरातील मारुती मंदिर येथे प्रतिष्ठापना करण्यात येणाऱ्या ‘श्री रत्नागिरी राजा’च्या मूर्तीचे मुंबईतून शनिवारी सायंकाळी आगमन झाले. दि. 19 सप्टेंबरपासून सुरु होणाऱ्या गणेशोत्सवासाठी श्री रत्नागिरी राजाची देखणी मूर्ती रत्नागिरी दाखल झाली आहे.
श्री रत्नागिरी राजा रत्नागिरी दाखल झाल्यानंतर साळवी स्टॉपपासून सवाद्य मिरवणुकीने उत्सव साजरा होणाऱ्या मारुती मंदिर पर्यंत आणण्यात आली. दरम्यान श्री रत्नागिरी राजाचे रत्नागिरी आगमन होणार असल्याची बातमी आधीच लागल्याने नागरिकांनी मिरवणुकीच्या मार्गावर श्री रत्नागिरी राजाला पाण्यासाठी गर्दी केली होती. मारुती मंदिरच्या दिशेने शहरात येणाऱ्या प्रमुख रस्त्याच्या एका मार्गिकेने श्री रत्नागिरी राजाची आगमन मिरवणूक काढण्यात आली.

जेमतेम पंधरा दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवासाठी श्री रत्नागिरी राजाची मूर्ती आधीच शहरात दाखल झाल्याने तसेच शहरातील दुकाने गणेशोत्सवासाठीच्या विविध वस्तू तसेच मखरांनी सजू लागल्यामुळे पंधरा दिवस आधीच गणेशोत्सवाची चाहूल लागली आहे.
