रत्नागिरी : गणेशोत्सव 2023ची मंगलमय धून कानी पडू लागली आहे. अवघ्या काही तासांवर येऊन ठेपलेल्या या गणेशोत्सवासाठी मुंबई, पुण्यात नोकरी व्यवसायानिमित्त राहणाऱ्या कोकणवासियांचे आगमन सुरू झाले आहे. कोकणात गणेशोत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा केला जात असल्याने नोकरी-व्यवसायासाठी परगावी स्थायिक असलेले चाकरमानी गावाकडे येऊ लागले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात मागील दोन दिवसात राज्य परिवहन महामंडळाच्या १४५० गाड्या दाखल झाल्या असून सोमवारी १०५० जादा गाड्या येणार आहेत.
दरवर्षी मुंबई व उपनगरातून कोकणातील विविध ठिकाणी जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी जादा गाड्या सोडण्यात येतात. शनिवार, रविवारी सुट्टी असल्याने जोडून सोमवारची रजा टाकून भाविक गावी येऊ लागले आहेत. भाविक मोठ्या संख्येने उत्सवासाठी गावी येणार असल्याने गाड्यांची संख्या वाढली आहे.
गणेशोत्सवासाठी चाकरमान्यांच्या खाजगी वाहनांसह बसेसची संख्या देखील मोठी असल्यामुळे रविवारी मुंबई- गोवा महामार्गावर रायगडसह रत्नागिरी जिल्ह्यातील विविध ठिकाणी वाहतूक कोंडी झालेली पाहायला मिळाली. अनेक ठिकाणी मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरणणाचे काम अपूर्ण असल्याने तसेच खड्डेमय महामार्गामुळे चाकरमान्यांचे हाल झाले.














