सावर्डे वन विभागाकडून कारवाई
देवरूख (सुरेश सप्रे) : बेकायदा वृक्षतोड रोखण्यासाठी वन विभागाने केलेल्या आवाहनाच्या अनुषंगाने प्राप्त झालेल्या खबरीनुसार मौजे वीर ता. चिपळूण येथील महादेव हरी वीरकर यांच्या मालकी क्षेत्रातील मनाई जातीची एकूण १४५ व बिगर मनाई जातीची एकूण २५३ झाडे विनापरवाना तोड केल्याचे निदर्शनास आल्याने या झाडतोडीपासून तयार केलेला इमारती व अनगड नग २१/३.७४० घ.मी. व मनाई / बिगर मनाई जळावू किटा २२८.००० घ.मी. इतका लाकुड माल जप्त केला.
रत्नगिरी जिल्हयातील जंगल तोडीमुळे मोठ्या प्रमाणात निसर्गाचे नुकसान होत आहे. त्याचबरोबर जैवविविधता धोक्यात आली असून वन्यजीवांचे अधिवास नष्ट होत चालले आहेत. वृक्षतोड रोखण्यासाठी वन विभागाकडून माहिती देण्याबाबत नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे.
दुसरी कारवाई मौजे नारदखेरकी ता. चिपळूण येथील शिवाजी अंबाजी यादव यांच्या मालकी क्षेत्रातील मनाई जातीची एकूण १० व बिगर मनाई जातीची एकूण ९५ झाडे विनापरवाना तोड केल्याचे निदर्शनास आल्याने सदर झाडतोडीपासून तयार केलेला इमारती व अनगड नग १००/५.६३० घ.मी. व मनाई/बिगर मनाई जळावू किटा ८९.९०० घ.मी. इतका लाकुड माल जप्त केला.
दोन्ही कारवाया उमेश आखाडे (वनपाल सावर्डा) कु.आश्विनी जाधव (वनरक्षक गुढे) यांनी श्रीम. राजश्री किर परिक्षेत्र वन अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली केल्या. याबाबत पुढील चौकशी वनपाल सावर्डे व वनरक्षक गुढे यांच्यामार्फत सुरु आहे
या बाबत गावपातळीवर अवैध वृक्षतोड अथवा अवैध वाहतूक सुरु असल्यास याबाबत स्थानिक वन अधिकारी यांचेशी तात्काळ सपंर्क साधणेबाबत आवाहन करण्यात आले आहे. वन विभागाचा टोल फ्रि क्र.१९२६ या क्रमांकावर वा वैभव सा. बोराटे, वनक्षेत्रपाल फिरते पथक रत्नागिरी (चिपळूण) संपर्क क्रं-८६००४७९५९२ या ठिकाणी संपर्क साधण्याचे आवाहन हि विभागीय वन अधिकारी दीपक खाडे यांनी केले आहे.
