देवरुख दि. २७ : कर्तव्यनिष्ठ व कर्तृत्ववान तरुण पिढी घडविण्यासाठी २४ सप्टेंबर, १९६९ पासून ‘नॉट मी बट यु’ या तत्त्वाने प्रेरित होऊन राष्ट्रीय सेवा योजना दिन साजरा करण्यात येतो. देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे कनिष्ठ महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्यावतीने राष्ट्रीय सेवा योजना दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
यानिमित्ताने एनएसएस कार्यक्रमाधिकारी प्रा. सौ. सीमा शेट्ये यांनी विद्यार्थ्यांना स्वयंसेवकांची भूमिका व जबाबदारी स्पष्ट करून सांगितली. वृक्षसंवर्धन, श्रमदान, व्यसनमुक्ती कार्यक्रम, स्वच्छता मोहीम, प्लास्टिक मुक्ती, पाणी वाचवा व संवर्धन, स्वच्छता व आरोग्य इत्यादीतून विद्यार्थ्यांनी सामाजिक जाणीव कशी जपावी याविषयी विवेचन केले.

या कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांसाठी एनएसएस दिनाचे महत्त्व अधोरेखित करणारा व्हिडिओ प्रदर्शित करण्यात आला. यामध्ये एनएसएसचे बोधचिन्ह, त्यामधील रंगांचे अर्थ व महत्त्व सांगण्यात आले. त्याचबरोबर एनएसएस कॅम्पची आवश्यकता, विविध पातळयांवर घेतली जाणारी एनएसएस शिबिरे, साजरे करण्यात येणारे विविध महत्वपूर्ण दिन व उपक्रम यांविषयीची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. या दिनाच्या औचित्याने महाविद्यालयातील विद्यार्थी सुयोग चंद्रकांत रहाटे व अक्षय शिवाजी वहाळकर यांनी रेखाटलेली पोस्टर्स लक्षवेधी ठरली.
या प्रसंगी कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा. मोहन लुंगसे यांनी विद्यार्थ्यांना राष्ट्रीय सेवा योजना दिनाच्या शुभेच्छा देताना आदर्श विद्यार्थ्यांमधील नेतृत्व, शिस्त, स्वावलंबन या मूल्यांचे महत्त्व पटवून दिले. या कार्यक्रमासाठी प्रा. प्रवीण जोशी, प्रा. अभिनय पातेरे, प्रा. मयुरेश राणे, प्रा. शिवराज कांबळे, ग्रंथपाल प्रा. सुभाष मायंगडे यांनी मेहनत घेतली. या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी संस्थाध्यक्ष सदानंद भागवत, नेहा जोशी, कुमार भोसले, शिरीष फाटक, ॲड. वेदा प्रभुदेसाई, प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर, उपप्राचार्य डॉ. सरदार पाटील, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कौतुक केले.
