भाटये, मांडवी समुद्रकिनारे गर्दीने फुलले
रत्नागिरी : अनंत चतुर्दशीपर्यंत भक्तांच्या घरी पाहुणचार घेतल्यानंतर दहा दिवसांच्या गणरायाला गुरुवारी सायंकाळी येथील मांडवी तसेच भाटये समुद्रकिनारी अत्यंत उत्साहात निरोप देण्यात आला. यावेळी गर्दीचे नियंत्रण करण्यासाठी पोलिसांनी गणरायाच्या मूर्ती नेणाऱ्या वाहनांनाच मांडवी समुद्रकिनाऱ्यापर्यंत जाण्यास परवानगी दिली होती. बाकीची वाहने आठवडा बाजार रोडवर लावण्यात आल्यामुळे बीचकडे जाणाऱ्या रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली नाही.

गुरुवारी रत्नागिरी जिल्ह्यात दहा दिवसांच्या गणरायाला अत्यंत उत्साहात निरोप देण्यात आला. ठिकठिकाणी काढण्यात आलेल्या विसर्जन मिरवणुका निर्विघ्नपणे पार पडल्या. जिल्हा तसेच पोलीस प्रशासनाने विसर्जन मिरवणुकांच्या दरम्यान चोख बंदोबस्त तैनात केला होता. रत्नागिरी शहरात मांडवी बीचवर मोठ्या संख्येने बाप्पाला निरोप दिला जातो. या विसर्जन मार्गावर यावेळी भारतीय जनता पक्षाकडून गणेश भक्तांचे स्वागत करण्यासाठी आठवडा बाजाराकडून मांडवी बीचकडे जाणारा कॉर्नर तसेच मांडवी समुद्रकिनारी स्वागत कक्ष उभारण्यात आला होता.

विसर्जनादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी प्रशासनाकडून गर्दीवर ड्रोन कॅमेऱ्याद्वारे लक्ष ठेवले जात होते. रात्री उशिरापर्यंत अत्यंत उत्साही वातावरणात दहा दिवसांच्या गणरायाला निरोप देण्यात आला.

