कृषी-औद्योगिक संघाच्या संचालकपदी राष्ट्रवादीच्या पूजा निकम तर भाजपच्या ऋतुजा कुळकर्णी बिनविरोध

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा कृषी औद्योगिक सर्व सेवा संघाच्या संचालकपदी दोन महिलांची बिनविरोध निवड झाली. चिपळुणच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सौ. पूजा शेखर निकम आणि रत्नागिरीतील भाजपाच्या सौ. ऋतुजा उमेश कुळकर्णी यांची बिनविरोध निवड झाली आहे. शनिवारी (ता. ४) ही निवड घोषित करण्यात आली. मागेच ठरल्याप्रमाणे राष्ट्रवादी व भाजपाने या दोन जागांवर यश मिळवले आहे.

सौ. पूजा निकम

भाजपाचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष आणि जिल्हा बॅंकेचे संचालक, सहकारतज्ज्ञ अॅड. दीपक पटवर्धन, तसेच जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे, उपाध्यक्ष बाबाजी जाधव यांनी कृषी, औद्योगिक संघाच्या संचालकपदी कोणी अर्ज भरायचे हे ठरवले होते. त्यामुळे एक जागा राष्ट्रवादीला व दुसरी जागा भाजपाला मिळाली आहे. या अनुषंगाने भाजपाने चांगलेच यश मिळवले आहे. सहकार क्षेत्रात भाजपाचे कामकाज वाढत असल्याचे हे द्योतक आहे, असे म्हटले तर वावगे ठरू नये.

ऋतुजा कुळकर्णी

बिनविरोध निवडून आलेल्या संचालिका सौ. ऋतुजा कुळकर्णी रत्नागिरी तालुक्यातील धामणसे येथील ग्रामपंचायतीच्या सदस्य आहेत. यापूर्वी त्यांनी सदस्यपदाची निवडणूक दोन वेळा लढवली आणि त्या विजयी झाल्या आहेत. तसेच त्या धामणसे विविध कार्यकारी सोसायटीच्या तज्ज्ञ संचालिका आहेत. त्या भारतीय जनता पक्षाच्या सक्रिय कार्यकर्त्या असून नजीकच्या काळात जिल्हा खरेदी विक्री संघावर संचालक म्हणून निवडून आलेल्या पहिल्या महिला ठरल्या आहेत.

कृषी, औद्योगिक संघाच्या संचालकपदी निवड झाल्यानंतर सौ. ऋतुजा कुळकर्णी यांनी सर्वांचे आभार मानून भविष्यात शेतीसंदर्भाने, शेतकरी, उद्योजकांना उपयुक्त असे कामकाज करू, असे मत व्यक्त केले.सौ. पूजा निकम आणि सौ.ऋतूजा उमेश कुळकर्णी यांच्या या निवडीबद्दल भाजपाचे नेते, राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांच्यासह भाजपा पदाधिऱ्यांनी सौ.ऋतूजा उमेश कुळकर्णी यांचे अभिनंदन केले आहे. 

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE