परीक्षा संपताच पैसा फंडचे विद्यार्थी रमले किल्ले, आकाशकंदील बनविण्यात!

विविध रांगोळ्यांनी मुलींची कला बहरली

संगमेश्वर : प्रथम सत्राची परीक्षा झाली की, मुलांना वेध लागतात ते दीपावलीच्या सुट्टीचे . सध्याचा जमाना हा तयार वस्तू घेण्याचा असल्याने मुलांना आकाशकंदील तयार करणे, किल्ल्यांची वैविध्यपूर्ण उभारणी करणे अशा जून्या परंपरा काहीशा विस्मरणात गेल्या असल्याने परीक्षा झाल्यानंतर लगेचच दोन दिवस संगमेश्वर येथील पैसा फंड इंग्लिश स्कूल मधील सारे विद्यार्थी किल्ले,आकाशकंदील आणि रांगोळी घालण्यात रमले होते. गत दोन दिवसात विद्यार्थ्यांनी आपल्यातील आगळावेगळा कलाविष्कार सादर करुन मनमुराद आनंद लुटला.

परीक्षा झाल्यानंतर मुलांना थोडा विरंगुळा हवा याच बरोबर घरी गेल्यानंतर त्यांनी मोबाईल घेऊन बसू नये यासाठी संगमेश्वर येथील व्यापारी पैसा फंड संस्थेच्या पैसा फंड इंग्लिश स्कूलने यावर्षी दिवाळी सुट्टी पूर्वी दोन दिवस शाळेच्या परिसरातच किल्ले बनविणे , विविध प्रकारचे आणि आकारांचे आकाशकंदील तयार करणे याच बरोबर सुंदर सुंदर रांगोळ्या घालण्याच्या स्पर्धांचे आयोजन केले होते . पाचवीतील मुलांपासून बारावी पर्यंतची सर्व मुले या कामात अशी काही मग्न झाली की, त्यातून विद्यार्थ्यांमधील आगळ्यावेगळ्या कलेचा आविष्कार पहायला मिळाला .

मुलांचे चिमुकले हात दगड आणण्यात , माती कालवण्यात , कागदकाम करण्यात कमालीचे व्यस्त झाले . कोणाच्या गालाला माती लागत होती तर कोणाच्या कपड्यांना मात्र या कशाचीही तमा न बाळगता मुलांनी आपले लक्ष केंद्रित केले होते , ते आपल्या कलाविष्कारावर ! पाचवी ते दहावीच्या मुलांनी जवळपास तिनशे पेक्षा अधिक आकाश कंदील शाळेत तयार केले . हे सारे आकाशकंदील शाळेच्या दर्शनी भागाला लावले.

महामार्गावरुन जाणारे वाहनचालक, स्थानिक ग्रामस्थ, पालक हा सुंदर नजारा पाहून विद्यार्थ्यांच्या कलेसह या उपक्रमाचे कौतुक करत आहेत . मुलांनी एकत्र येवून किल्यांच्या सुंदर प्रतिकृती तयार केल्या . किल्ल्यांची रचना कशी असते , याचा अभ्यासही यामुळे मुलांना करता आला . प्रशालेतील मुलींनी एकत्र येत ३० पेक्षा अधिक नेत्रदीपक अशा रांगोळ्या घातल्या . सुट्टीला जाण्यापूर्वी गेले दोन दिवस प्रशालेतील मुले अशा वेगळ्या उपक्रमात रमून त्यांनी आनंद घेतल्यामुळे पालकवर्गानेही पैसा फंडच्या या उपक्रमाचे कौतुक केले आहे.

संस्थाध्यक्ष अनिल शेट्ये , उपाध्यक्ष किशोर पाथरे , सचिव धनंजय शेट्ये , सदस्य संदीप सुर्वे , रमेश झगडे , मुख्याध्यापक सचिनदेव खामकर , पर्यवेक्षक दिलीप मोरगे यांनी सर्व विद्यार्थी , मार्गदर्शक शिक्षक , सर्व वर्गशिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांचे अभिनंदन करुन कौतुक केले आहे.

मोबाईलपासून मुलांना दूर ठेवण्याचा प्रयत्न

व्यापारी पैसा फंड संस्थेने अभ्यासाबरोबरच मुलांच्या कलाविष्काराला प्राधान्य देण्यासाठी तसेच मुलांचा मोबाईलकडे वाढत असलेला कल पालकवर्गाला त्रासदायक ठरत असल्याने त्यातून विद्यार्थी परावृत्त कसे होतील यासाठी दीपावली सुट्टी पूर्वी सलग दोन दिवस विद्यार्थ्यांच्या कलाविष्काराला प्राधान्य देता यावे म्हणून किल्ले तयार करणे, आकाशकंदील बनविणे आणि रांगोळ्या घालणे असा उपक्रम राबविला असल्याचे संस्था सचिव धनंजय शेट्ये यांनी सांगितले . प्रशालेत मोबाईल आणायला सक्त बंदी असून मोबाईल आणि सोशल मीडियाचा अती वापर केल्याने होणाऱ्या तोट्यांबाबत प्रशालेत प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन केले जात असल्याचे धनंजय शेट्ये यांनी नमूद केले.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

best news portal development company in india

READ MORE