आदिवासीं बांधवांची दिवाळी झाली गोड!

  • समाजसेवक राजू मुंबईकर, सुभाषशेठ भोपी सामाजिक विकास संस्था आणि डाबर इंडिया कंपनीच्या संयुक्त विद्यमाने आदिवासीं बांधवांना दिवाळी फराळ वाटप

उरण दि. १४ (विठ्ठल ममताबादे ) : केअर ऑफ नेचर सामाजिक संस्थेचे संस्थापक तथा रायगड भूषण राजू मुंबईकर, सुभाषशेठ भोपी सामाजिक विकास संस्था आणि आज त्यांच्या सोबतीला जोडली गेलेली एक संस्था जी मुंबई शहरात कॅन्सर पीडित मुलां – मुलींकरिता आशेचा किरण बनून काम करणारी मुंबई येथील एक आदर्शवत संस्था ( ट्रस्ट )अखिला मेमोरियल ट्रस्ट मुंबई, डाबर इंडिया कंपनी, श्री.समर्थ कृपा सखी स्वयं सहाय्यता संस्था उरण यांच्या सहकार्यातून आज पुन्हा एकदा दिवाळी सणाच्या निमित्ताने उरण – रानसई येथील खोंड्याचीवाडी, बंगल्याचीवाडी, मार्गाची वाडी, खैरकाठी आदिवासीं वाडी या आदिवासीं वाड्यांवरील आदिवासीं बांधवांना त्यांच्या परिवाराचा दिवाळी सण आनंदात साजरा व्हावा ही भावना मनाशी बाळगत त्यांना दिवाळी निर्मित रवा,मैदा,साखर, गुलाबजाम पाकीटं आणि चिमुकल्या बाळगोपालांकरिता डाबर ग्लूकॉनडी एनर्जी ड्रिंक्सची पाकीटं वाटप करण्यात आले.

यावेळी पनवेल तारा येथील कोरलवाडी आदिवासींवाडी या वाडीवरील आदिवासीं बांधवांना डाबर इंडिया कंपनीचे रिअल फ्रेश फ्रूट ज्यूस,डाबर रेड टूथपेस्ट, ग्लुकॉनडी एनर्जी ड्रिंक्सचे डब्बे वाटप करण्यात आले.

सोबतच त्या वाडीवरील एक निराधार आजी – आजोबांचं जोडप्याला राजू मुंबईकर यांच्या वतीने महिना भराच दुकाणाचे सामान, रेशन भरून देऊन त्यांना नवीन कपडे देखील देण्यात आले.


प्रत्येक सण – उत्सवात आपल्या करिता प्रेमाची गोड भेट घेऊन येणारे आपले राजूदादा मुंबईकर ह्या वेळी सुद्धा नक्कीच आपल्या करिता काहीतरी सामान घेऊन येतील या आतुरतेने वाट पाहत असलेले आदिवासीं महिला भगिनींना ,बांधवांना जेव्हा ही प्रेमाची दिवाळी भेट म्हणून मिळालेलं सामान घेऊन आपल्या घरी जाताना त्यांच्या चेहऱ्यावरचा तो ओसंडून वाहणारा आनंद मन भारावून टाकणारा होता.

केअर ऑफ नेचर सामाजिक संस्थेचे संस्थापक राजू मुंबईकर आणि सुभाषशेठ भोपी सामाजिक विकास संस्था,अखिला मेमोरियल ट्रस्ट मुंबई यांच्या औदार्यातून आणि डाबर इंडिया कंपनी व श्री समर्थ कृपा सखी स्वयं सहाय्यता संस्था उरण यांच्या सहकार्यातून साकारलेल्या ह्या आनंददायी कार्यक्रमा करिता प्रमुख मान्यवर म्हणून उपस्थिती लाभली होती ती लांजा तालुक्यातील कुरुचुंब गावचे जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते सध्या मुंबईत वास्तव्यास असलेले नारायणजी माने, वेश्वी गावचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते जयंत कडू, केअर ऑफ नेचर सामाजिक संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक स्नेहल पालकर,वेश्वी गावचे सामाजिक कार्यकर्ते विनोददादा पाटील,आगरी कोळी कराडी संघर्ष सामाजिक संस्थेचे उरण तालुका सचिव अनिल घरत, स्नेहाताई पाटील आणि खोंड्याचीवाडी,बंगल्याची वाडी,मार्गाचीवाडी,खैरकाठी आदिवासींवाडीकोरलवाडी या आदिवासीं वाड्यांवरील आदिवासीं बांधव,महिला भगिनीं आणि लहान चिमुकल्यांच्या उपस्थितीत हा अनोखा आणि आनंददायी कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE