मुंबई : मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस ते कोकण रेल्वे मार्गावरील मडगावपर्यंत धावणाऱ्या एक्सप्रेसचे वेळापत्रक कोकण रेल्वेचे नॉन मॉनन्सूनमधील वेळापत्रक लागू झाल्यापासून बिघडले आहे. जाणाऱ्या आणि येणाऱ्या गाडीच्या फेऱ्यांसाठी स्वतंत्र रेक नसल्याने १ नोव्हेंबरपासून ही गाडी तीन ते चार तास किंवा कधी कधी त्याहीपेक्षा जास्त विलंबाने धावत आहे.
कोकण रेल्वे मार्गावर पूर्वी सुरू असलेली डबल डेकर एक्सप्रेस बंद करून त्या ठिकाणी गेल्या वर्षी 22 डब्यांची एलएचबी गाडी सुरू करण्यात आली. कोकण रेल्वेच्या पावसाळी वेळापत्रकानुसार ही गाडी आठवड्यातून दोन दिवस तर बिगगर पावसाळी वेळापत्रकानुसार आठवड्यातील चार दिवस कोकण रेल्वे मार्गावर धावते.
दिनांक १ नोव्हेंबर 2023 पासून कोकण रेल्वेच्या मार्गावरील गाड्यांसाठी बिगर पावसाळी वेळापत्रक सुरू झाले आहे. यामुळे काही गाड्यांच्या फ्रिक्वेन्सीमध्ये तर काही गाड्यांच्या वेळापत्रकात काहीसा बदल झाला आहे. वास्तविक हा बदल दरवर्षीच होत असतो. मात्र, यावेळी लोकमान्य टिळक टर्मिनस ते मडगाव दरम्यान धावणारी (11099/11100) ही आठवड्यातून चार दिवस धावणारी गाडी दि. १ नोव्हेंबरपासून बिघडलेल्या वेळापत्रकानुसार धावत आहे. याचा प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. मुंबईतून सुटलेली ही गाडी गोव्यात मडगावला पोहोचल्यानंतर सायंकाळी लोकमान्य टिळक टर्मिनसपर्यंतच्या प्रवासासाठी निघते. दोन्ही बाजूच्या प्रवासासाठी एकच रेक असल्यामुळे एका बाजूच्या गाडीला विलंब झाल्यावर तोच रेक वापरून दुसऱ्या बाजूने निघणाऱ्या गाडीला देखील आपसूकच विलंबाचा फटका सहन करावा लागत आहे. यामुळे या गाडीचे आरक्षण केलेल्या प्रवाशांना फटका सहन करावा लागत आहे.
उपलब्ध माहितीनुसार या गाडीचे रेक शेअरिंग बिहार राज्यातील पाटलीपुत्रपर्यंत धावणाऱ्या गाडीशी आहे. लांब पल्ल्याच्या या दोन्ही मार्गावरील गाड्या चालवताना रेल्वे आपल्या सोयीनुसार रेकची अदलाबदल करते.
जाणाऱ्या तसेच येणाऱ्या गाडीसाठी स्वतंत्र रेक उपलब्ध असता तर ही वेळ आली नसती असे प्रवाशांचे मत आहे. या कारणामुळे ही गाडी उशिराने धावत असल्यामुळे मध्य रेल्वेने याचा गंभीरपूर्वक विचार करून रात्री उशिराने मुंबईतील कोकण रेल्वे मार्गावर येण्यासाठी निघणाऱ्या या एक्सप्रेस गाडीचे वेळापत्रक सुरळीत करावे, अशी मागणी केली जात आहे.
