मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ३० रोजी रत्नागिरीत ; मेडिकल कॉलेजचे करणार उद्घाटन

रत्नागिरी : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गुरुवार दि. 30 नोव्हेंबर रोजी रत्नागिरी जिल्ह्याच्या दौर्‍यावर येणार आहेत. त्यांचा अधिकृत दौरा कार्यक्रम जाहीर व्हायचा असला तरी त्यांच्या संभाव्य दौऱ्याची तयारी सुरू आहे. खेडमधील लोटे एमआयडीसीत कोकाकोला कंपनीचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते होणार आहे. याचवेळी रत्नागिरी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा शुभारंभ व केंद्र आणि राज्य शासनाच्या योजनांतर्गत लाभार्थ्यांना वस्तूंचे वाटप होणार आहे.

राज्याचे उद्योग मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासनाने या बाबत तयारी सुरु केली आहे.


रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथील लोटे एमआयडीसीमध्ये कोकोकोला ही आंतरराष्ट्रीय कंपनी आपला प्रकल्प उभारत असून, यातून सुमारे 1100हून अधिक बेरोजगारांना रोजगार थेट कंपनीत उपलब्ध होणार आहेत. कोट्यवधी रुपयांच्या या प्रकल्पामुळे रत्नागिरीतील तरुण वर्गाला यामुळे नोकरीची सुवर्णसंधी निर्माण झाली आहे. कोट्यवधी रुपयांच्या या प्रकल्पाचे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते भूमिपूजन होणार आहे.


या प्रकल्पाच्या भूमिपूजन कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री थेट रत्नागिरीत येणार असून, रत्नागिरीत सुरु झालेल्या मेडिकल कॉलेजचा अधिकृत शुभारंभ त्यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी मेडिकल कॉलेज व फार्मसी कॉलेजच्या विद्यार्थ्यांशी ते संवाद साधणार आहेत. रत्नागिरीत मेडीकल कॉलेजचे पालकमंत्री उदय सामंत यांनी पाहिलेले स्वप्न पूर्ण करण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सिंहाचा वाटा आहे. मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर कोट्यवधी रुपयांचा निधी त्यांनी तातडीने उपलब्ध करुन दिल्यानंतर मेडिकल कॉलेज मार्गी लागले होते. याचबरोबर केंद्र व राज्य शासनाच्या विविध योंजनांमधील लाभार्थीना वस्तूंचे वाटपही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे.


जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासन मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी करीत आहेत.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE