देशासाठी बलिदान देणाऱ्या सैनिकांसाठी निधी संकलनात योगदान द्या : जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह


जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते ध्वजदिन निधी संकलन शुभारंभ


रत्नागिरी, दि. 7 : देशासाठी बलिदान देणाऱ्या सैनिकांप्रती असणाऱ्या निधी संकलनात जास्तीत जास्त योगदान द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी केले.


जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्यावतीने येथील अल्प बचत सभागृहात झालेल्या कार्यक्रमात ध्वजदिन निधी संकलनाचा शुभारंभ जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते आज झाला.
याप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, उपजिल्हाधिकारी (सर्वसाधारण) शुभांगी साठे, जिल्हा पुरवठा अधिकारी रोहिणी रजपूत, प्रांताधिकारी जीवन देसाई, सहायक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी संतोष परब आदी उपस्थित होते.


निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी स्वागत करुन प्रास्ताविक केले. ते म्हणाले, सन 2023 साठी आपल्या जिल्हयाने आतापर्यंत 86 टक्के निधी संकलनाचे उद्दिष्ट्य पूर्ण केले आहे. मागील वर्षाप्रमाणेच यंदाही 61 लाख 18 हजार रुपयांचे उद्दिष्ट्य आपण सर्वजज मिळून पूर्ण करु या. मागील वित्तीय वर्षात 23 लाख 52 हजार 120 रुपयांची मदत विविध कारणांसाठी कल्याणकारी निधीतून वाटण्यात आली आहे.


जिल्हाधिकारी श्री. सिंह म्हणाले, सैनिकांप्रमाणे आपल्या सर्वांच्या जीवनात शिस्त पालन असणे आवश्यक आहे. 86 टक्के उद्दिष्ट्य पूर्ण केल्याचा आनंद असला तरी सर्वांनी निधी संकलनास आपले योगदान देवून 100 टक्के उद्दिष्ट्य पूर्ण करुन जिल्ह्याला अग्रेसर ठेवा. देशासाठी बलिदान देणाऱ्या सैनिकांप्रती, त्यांच्या कुटुबांप्रती निधी देवून आपण आपले कर्तव्य बजावले पाहिजे. स्वच्छता, व्यायाम, योग्य आहार यामधून निरोगी जीवन जगण्यासाठी सैनिकांच्या शिस्तीचे विद्यार्थ्यांनी पालन करावे, असेही ते म्हणाले.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी अमर जवान प्रतिमेला पुष्पचक्र वाहून शहिदांना आदरांजली वाहण्यात आली. वीर नारी छाया कदम, शौर्य पदक धारक नायक बजरंग मोरे, माजी सैनिक अरुण आठल्ये, युध्द विधवा, विशेष गौरव पुरस्कार प्राप्त आदींचा तसेच निधी संकलनास योगदान देणाऱ्या विभागांचाही यावेळी सन्मान करण्यात आला.


सैनिकी मुलींच्या वस्ती गृहातील मुलींनी आणि अंजली लिमये यांनी यावेळी देश भक्तीपर गीते गायिली. पूर्वा पेठे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. निवृत्त मेजर सुभेदार लक्ष्मण गवळी यांनी सर्वांचे आभार मानले.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE