- लोकसभा निवडणूक 2024; गोव्याच्या मुख्यमंत्र्यांसह घटक पक्षांचा सहभाग
रत्नागिरी : रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांनी शुक्रवारी दुपारी हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत तगडे शक्तीप्रदर्शन करीत आपला उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी एम. देवेंदर सिंह यांच्याकडे सादर केला.
उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शुक्रवारच्या अंतिम दिवशी महायुतीमधील घटक पक्षांच्या उपस्थितीत भाजपचे केंद्रात मंत्री असलेले नारायण राणे यांनी महायुतीचे उमेदवार म्हणून शुक्रवारी अर्ज भरला.

अर्ज दाखल करण्यापूर्वी सकाळी साडेनऊ ते दहा वाजल्यापासून मतदारसंघाच्या विविध भागातून महायुतीचे कार्यकर्ते, पदाधिकारी वाहनांनी दाखल होत होते. यानिमित्ताने रत्नागिरी तसेच सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यांमधून मोठ्या संख्येने वाहने आल्याने शहरातील वाहतुकीवर जाताना वाढला होता.

हजारो कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मारुती मंदिर येथून रॅलीने जात महायुतीचे उमेदवार नारायण राणे हे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवाराबाहेर पोहोचले. तेथे दोन दोन कंटेनरवर उभारलेल्या मोबाईल स्टेजवरून नारायण राणे यांनी उपस्थितांना संबोधित केले. कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून पाठिंबा दर्शवल्याबद्दल ना. राणे यांनी सर्वांचे आभार मानले.
यानंतर नारायण राणे यांनी आपला उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी एम देवेंदर सिंह यांच्याकडे सादर केला. यावेळी त्यांच्यासोबत गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, ना. रवींद्र चव्हाण, ना. दीपक केसरकर, किरण तथा भैया सामंत, आमदार शेखर निकम आदी उपस्थित होते.
