देवरुख बसस्थानकातील आरक्षण सुविधा बंद ; प्रवाशांची गैरसोय

देवरुख दि. २७: राज्य परिवहन महामंडळाच्या देवरुख बस स्थानकातील आरक्षण सुविधा शनिवारपासून इंटरनेट अभावी बंद आहे. स्थानकाला देण्यात आलेल्या इंटरनेट जोडणीचा वेग कमी असल्याने आरक्षण देण्यात अडथळे निर्माण होत आहेत. सध्या मुंबईकडे जाण्यासाठी मोठी गर्दी असून प्रवासी रांगा लावून आरक्षण मिळवण्याच्या प्रतीक्षेत असताना आरक्षण सुविधा बंद झाल्याने प्रवासी वर्गाने तीव्र संताप व्यक्त केला आहे. परिवहन मंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यानी या गैरसोयीकडे तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी संगमेश्वर तालुका प्रवासी संघटनेने केली आहे.

शनिवारी दुपारी १२ वाजेपर्यंत देवरुख बस स्थानकातील आरक्षण सुविधा कशीबशी सुरू होती. त्यानंतर इंटरनेट मध्ये तांत्रिक बिघाड निर्माण झाल्याने आरक्षण खिडकीवर कर्मचारी असूनही रांगेमध्ये उभ्या असणाऱ्या प्रवाशांना आरक्षण देता येत नव्हते. यामुळे नाहक आरक्षण मिळवण्यासाठी आलेले प्रवासी रांगेत ताटकळत उभे होते . देवरुख बस स्थानकात दूर दूर होऊन प्रवासी वर्ग बसच्या आरक्षणासाठी येत असतो. देवरुखात आल्यानंतर इंटरनेट अभावी आरक्षण सुविधा बंद आहे, असे कळल्यानंतर प्रवाशांमध्ये संताप निर्माण होतो. सकाळी लवकर येऊन रांगा लावणारे प्रवासी, आरक्षण खिडकी उघडल्यानंतर इंटरनेट सुविधा नसल्याने तासंतास रांगेत उभे राहात वाट पाहत असतात आणि आरक्षण न मिळाल्याने हात हलवत परत जातात .

मुंबईहून कोकणात दाखल झालेले चाकरमानी मुंबईला जाणाऱ्या बसचे आरक्षण करण्याकरता देवरुख बस स्थानकातील आरक्षण कक्षाकडे सध्या मोठ्या संख्येने येत आहेत. अशा स्थितीत प्रवाशांना तासनतास वाट पाहून आरक्षण न घेताच परत जावे लागत असल्याने, तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. राज्य परिवहन मंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या असुविधेकडे तातडीने लक्ष द्यावे आणि इंटरनेट मधील दोष दूर करण्यासाठी योग्य ती पावले उचलावीत अशी मागणी प्रवासी वर्गाने केली आहे. एस टी बसचे आरक्षण न मिळाल्याने प्रवासी वर्ग नाईलाजाने खाजगी बसचा आधार घेतो. एस टीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ही बाब लक्षात घेऊन देवरुख बस स्थानकातील आरक्षण कक्षात असणाऱ्या अडचणी तातडीने दूर न केल्यास बस स्थानकाच्या प्रवेशद्वारावर आंदोलन करण्याचा इशारा तालुका प्रवासी संघटनेने दिला आहे.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

best news portal development company in india

READ MORE