रत्नागिरीत पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते शुभारंभ
रत्नागिरी, दि. 6 : महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या शहरी वाहतुकीत महिला सन्मान योजना सवलतीचा शुभारंभ व प्रवास करणाऱ्या महिलांचा सन्मान सोहळा पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते आज स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर नाट्यगृह येथे पार पडला.
यावेळी रत्नागिरी शहरी वाहतूक बसला पालकमंत्री श्री. सामंत यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून व श्रीफळ वाढवून बस रवाना करण्यात आली.
रत्नागिरी विभागातर्फे शहरी वाहतुकीत लागू करण्यात आलेल्या महिला सन्मान योजना – शहरी वाहतुकीत महिला प्रवाशांना प्रवास भाड्यात 50 टक्के सवलत, ज्येष्ठ नागरिक योजना- 65 ते 75 वर्षापर्यंतच्या ज्येष्ठ नागरिकांना शहरी वाहतूक प्रवास भाड्यात 50 टक्के सवलत. अमृत ज्येष्ठ नागरिक योजना – 75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना अमृत ज्येष्ठ नागरिक या योजनेअंतर्गत शहरी वाहतूक प्रवास भाड्यात 100% मोफत प्रवास सवलत योजना चालू करण्यात आली.

यावेळी सिंधुरत्नचे निमंत्रित सदस्य किरण सामंत, जिल्हाधिकारी एम.देवेंदर सिंह, पोलीस अधिक्षक धनंजय कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रक्रांत सूर्यवंशी, प्रांताधिकारी जीवन देसाई, तहसीलदार राजाराम म्हात्रे, नगरपरिषद मुख्याधिकारी तुषार बाबर, रा.प. महामंडळाचे विभाग नियंत्रक प्रज्ञेश बोरसे व एस.टी. महामंडळ आगारातील अधिकारी उपस्थित होते.

रत्नागिरीचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मित्र मंडळामार्फत जिल्ह्यातील विद्यार्थिनींना पालकमंत्री श्री. सामंत यांच्या हस्ते अहिल्याबाई होळकर पासचे अर्ज व ओळखपत्र मोफत वितरण करण्यात आले.
महाराष्ट्र शासनाच्या ग्रामीण वाहतुकीला लागू असलेल्या सवलत पालकमंत्री यांच्या प्रयत्नाने महामंडळाच्या रत्नागिरी विभागास लागू झालेली आहे. त्यामुळे शहर वाहतुकीला एक प्रकारची नवसंजीवनी प्राप्त झाली असून, रा. प. उत्पन्नात वाढ होऊन प्रवाशांना सुखकर प्रवास होण्यास मदत होणार आहे.
