- हिंदू जनजागृती समितीच्या वतीने उरण येथे हिंदू युवतींसाठी शौर्य प्रशिक्षण शिबिर संपन्न
उरण दि ५ (विठ्ठल ममताबादे ) : भारतात तसेच महाराष्ट्र राज्यातही सध्या अनेक युवती ‘लव्ह जिहाद’ला मोठया प्रमाणात बळी पड़त आहेत. अशाच एका ‘लव्ह जिहाद’च्या प्रकरणात नुकतीच उरण येथील कु. यशश्री शिंदे (२२) हिची अत्यंत क्रूरतेने आणि मानवतेला काळीमा फासणारी हत्या करण्यात आली. ‘लव्ह जिहाद’च्या या संकटासह युवती आणि महिलांवर होणारे अन्याय-अत्याचाराचे प्रसंग पाहता त्याला सामोरे जाण्यासाठी त्यांचे शारीरिक, मानसिक तसेच आध्यात्मिक बळ वाढणे आवश्यक आहे. हा उद्देश लक्षात घेऊन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने उरण शहरातील गणपती चौक येथील श्रीराम मंदिर सभागृहात हिंदू युवतींसाठी आयोजित केलेले शौर्य प्रशिक्षण शिबिर उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले.

या शौर्य प्रशिक्षण शिबिरामध्ये कराटे, दंडसाखळी प्रशिक्षण आणि स्वसंरक्षणाच्या सोप्या पद्धती शिकवल्या गेल्या. ‘अन्याय, अत्याचारांविरोधात लढण्यासाठी युवतींनी शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक दृष्टीने सक्षम होणे गरजेचे आहे,’ असे आवाहन यावेळी सनातन संस्थेच्या धनश्री केळशीकर यांनी केले.

यावेळी उपस्थित युवतींनी धर्मशिक्षण घेण्यासह स्वरक्षा प्रशिक्षण घेऊन सक्षम होण्याचा निर्धार व्यक्त केला. या शिबिरात अनेक युवतींनी उत्स्फूर्तपणे मनोगत व्यक्त करून हा स्तुत्य उपक्रम राबविल्याबद्दल हिंदू जनजागृती समितीचे आभार व्यक्त केले.
