- गणेशोत्सवापूर्वी कोकणवासीयांना नव्या रेल्वे गाडीची भेट मिळण्याची आशा
रत्नागिरी : मुंबईतील पश्चिम उपनगरातून थेट कोकणात येणाऱ्या रेल्वे कायमस्वरूपी गाडीची अनेक वर्षांपासूनची प्रलंबित मागणी येत्या गणेशोत्सवापूर्वी पूर्णत्वास जाण्याची आशा निर्माण झाली आहे. मुंबईतून वसई मार्गे थेट कोकण रेल्वे मार्गावर येणारी कायमस्वरूपी नसल्याने होणारी गैरसोय लक्षात घेऊन या दृष्टीने सकारात्मक पावले उचलली गेली आहेत.
सध्या कोकण रेल्वेच्या मार्गावरून मुंबईतून पश्चिम उपनगरामधून कायमस्वरूपी कोकण रेल्वे मार्गावर येणारी गाडी नाही. त्यामुळे मध्य रेल्वेच्या मार्गावरून सुटणाऱ्या गाड्यांवर उपनगरात राहणाऱ्या कोकणवासियांना अवलंबून राहावे लागते. मात्र ही गैरसोय येत्या गणेशोत्सवापूर्वी दूर होऊ शकेल या दृष्टीने रेल्वे मंत्रालय स्तरावर पावले उचलली गेली आहेत.
दीर्घकाळचा पाठपुरावा फळाला
पश्चिम रेल्वेच्या मार्गावरून मुंबई सेंट्रल बोरिवली किंवा बांद्रा येथून वसई मार्गे कोकण रेल्वेच्या मार्गावर थेट येणारी गाडी सुरू करावी अशी गेल्या अनेक वर्षांची मागणी आहे. मात्र वसईला आल्यानंतर गाडीचे इंजिन उलट्या दिशेला फिरवण्याचा खटाटोप करावा लागत असल्याचे कारण सांगून ही मागणी अद्यापही प्रलंबितच राहिले आहे. त्यादृष्टीने सकारात्मक पावले उचलली गेली आहेत. अशी कायमस्वरूपी कोकणात येणारी गाडी गणेशोत्सवापूर्वी सुरू होण्याची अशा निर्माण झाली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार येत्या आठ-दहा दिवसातही ही गाडी सुरू करणार असल्याचे बोलले जात आहे. मात्र त्याला अजून अधिकृत दुजोरा मिळालेले नाही.
