रत्नागिरीतील गुरुकुलच्या विद्यार्थ्यांची पैसा फंडच्या कलादालनाला भेट

  • कलाकृती पाहून विद्यार्थी भारावले
  • कलाविषयक उपक्रमांबाबत घेतली माहिती

संगमेश्वर :  रत्नागिरी येथील गंगाधर गोविंद पटवर्धन इंग्लिश मीडियम स्कूल संचलित बाबुराव जोशी गुरुकुल प्रकल्पाच्या इयत्ता सातवी मधील २९ विद्यार्थ्यांनी आज व्यापारी पैसा फंड संस्था संगमेश्वर संचलित पैसा फंड इंग्लिश स्कूलच्या कला वर्ग आणि कलादालनाला भेट देऊन प्रशालेतर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध कलाविषयक उपक्रमांची माहिती घेतली. कलादालनातील कलाकृती पाहून गुरुकुलचे विद्यार्थी भारावून गेले.

बाबुराव जोशी गुरुकुल प्रकल्प रत्नागिरीच्या इयत्ता सातवी मधील २९ विद्यार्थ्यांचा क्षेत्र भेट निवासी उपक्रम सध्या बुरंबी तालुका संगमेश्वर येथे सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून आज गुरुकुलच्या विद्यार्थ्यांनी पैसा फंड इंग्लिश स्कूल संगमेश्वरच्या कला वर्ग आणि कलादालन उपक्रमाला भेट दिली. कलादालना पुढे उभी असणारी ९ फूट उंचीची पेन्सिल पाहून विद्यार्थी भारावून गेले. कला विभागातर्फे विद्यार्थ्यांना पेन्सिलचे महत्त्व समजावून सांगण्यात आले.

पैसा फंड इंग्लिश स्कूल संगमेश्वर तर्फे गत २४ वर्षे राबविल्या जाणाऱ्या कलासाधना या चित्रकला वार्षिक उपक्रमाची विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती देण्यात आली. याबरोबरच कलाविषयक विविध उपक्रम, दैनंदिन सराव, शुभेच्छा पत्रांची निर्मिती, डिजिटल कलाशिक्षण याबाबत सर्व विद्यार्थ्यांना सखोल माहिती देऊन अवगत करण्यात आले. प्रशालेने सुरू केलेल्या कला वर्ग आणि कलादालन उपक्रमाचा कलेची आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांना कसा लाभ झाला, याविषयी गुरुकुलच्या विद्यार्थ्यांना विविध उदाहरणांसह माहिती देण्यात आली. हाताला उत्तम वळण येण्यासाठी विद्यार्थ्यांनी दैनंदिन सराव करावा असे आवाहन यावेळी कला विभागातर्फे गुरुकुलच्या विद्यार्थ्यांना करण्यात आले. पैसा फंड कलादालनात असणाऱ्या कलाकृती पाहून विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर तरळलेला आनंद यावेळी दिसून आला. उत्साही विद्यार्थ्यांनी विविध कलाकृतींसह पैसा फंड इंग्लिश स्कूलच्या कला विभागातर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध कलाविषयक उपक्रमांबाबत गुरुकुलच्या विद्यार्थ्यांनी सविस्तर माहिती जाणून घेतली आणि यातील काही उपक्रम आम्ही स्वतः घरी गेल्यानंतर करण्याचा प्रयत्न करू असे आश्वासन यावेळी पैसा फंड कला विभागाला दिले.

यावेळी कला विभागातर्फे सर्व विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी गुरुकुलचे शिक्षक अमोल पाष्टे , केदार मुळये, सौ. अश्विनी तांबे, साक्षी पंडित हे उपस्थित होते.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

best news portal development company in india

READ MORE