हर्णै समुद्रात गस्ती नौकेने पकडल्या बेकायदा मासेमारी करणार्‍या दोन बोटी

रत्नागिरी : एलईडी दिव्यांचा वापर करून लोकांना मासेमारी करण्यास बंदी असतानाही अशाप्रकारे बेकायदा मासेमारी करणाऱ्या दोन नौका समुद्रात गस्त घालणाऱ्या फिशरीज विभागाच्या गस्तीने नौकेने पकडल्या आहेत. या लोकांना जयगड बंदरात आणून पुढील कारवाई सुरू करण्यात आली.

या कारवाईत सुमारे 12 ते 15 लाख रुपयांचे एलईडी दिवे, जनरेटर व इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. ज्या नौकांवर हे साहित्य आढळून आले त्या दोन्ही नौका अटकावून ठेवण्यात आल्या आहेत. रायगडातील राजश्री आणि रत्नागिरीतील भाविका नावाच्या या दोन नौका जयगड बंदरात आणून अटकावून ठेवण्यात आल्या आहेत.

एलईडी साहित्य आढळून आलेल्या या दोन्ही नौका दाभोळ- हर्णे समुद्रात आढळून आल्या. सहाय्यक मत्स्य विभागाने अवैध मासेमारीवर कारवाई करण्यासाठी गस्ती मोहीम सुरु केली होती. या गस्तीवेळी राजश्री आणि भाविका या दोन नौका एलईडी दिव्यांच्या प्रकाशात मासेमारी करत असल्याचे आढळून आले. सहाय्यक आयुक्त आनंद पालव यांच्या निर्देशानुसार समुद्रात गस्त घातली जात आहे.
सहाय्यक मत्स्य विभागाचे परवाना अधिकारी चिन्मय जोशी, पार्थ तावडे, स्वप्नील चव्हाण सुरक्षा रक्षकांसोबत मत्स्य व्यवसाय विभागाच्या नौकेने गस्त घालत असताना रात्रीच्या वेळी या दोन नौका एलईडी मासेमारी करत असल्याचे दिसून आले.

या दोन्ही नौकांवरील जनरेटर व इतर एलईडी साहित्य जप्त करण्यात आले असून दोन्ही नौका जयगड बंदरात आणून अटकावून ठेवण्यात आल्या आहेत. या प्रकरणी आता सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्त आनंद पालव यांच्यासमोर सुनावणी होऊन दंडात्मक कारवाईचा निर्णय होणार आहे.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE