उरणमध्ये ५० टक्के जागांचे मालक परप्रांतीय

उरण दि २१(विठ्ठल ममताबादे ) :  वडिलोपार्जित शेकडो एकर जागा कवडीमोल भावाने विकून उरण तालुक्यातील शेतकरी अल्पभूधारक होताना दिसत आहे. एका सर्वेक्षणातून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामुळे नव्या पिढीसाठी ही बाब चिंतेची बनत आहे. सद्यस्थितीत तालुक्यातील ५० टक्क्यांहून अधिक जागांचे मालक हे परराज्यातील किंवा अन्य जिल्ह्यांतील आहेत. तालुक्यात असणार्‍या मोक्याच्या जागा या आधीच बळकावल्या गेल्या आहेत. त्यामुळे उरणच्या स्थानिकांचे अस्तित्व जवळपास संपुष्टात येताना दिसत आहे.
तालुक्यातील अनेक ठिकाणी अन्य राज्यातील लोकांनी जमिनी खरेदी केल्याचे व्यवहार झाले आहेत. त्यामुळे अनेक ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात घरे,
रो -हाऊसेस, बंगलो, बांधकामाच्या नोंदी दर महिन्याला होताना दिसत आहेत. शेकडो एकर जागा खरेदी केलेले परप्रांतीय मालकांना गाव पातळीवर विरोध होऊ नये म्हणून मंदिर, सार्वजनिक इमारती, सार्वजनिक सुविधा अशा ठिकाणी ते देणगी देत असून स्थानिक पुढार्‍यांचे ‘खिसेही गरम’ केले जात असल्याची चर्चा सुरु आहे.
तालुक्यातील अनेक जागांचे व्यवहार हे बनवाबनवी करून झाले असल्याचीही ओरड होताना दिसत आहे. स्थानिकांकडून खरेदी केलेल्या जागेवर विकसकांनी रो-हाऊसेस, बंगलो बांधून शेकडो लोकांना त्याची विक्री केली आहे. यातील अनेक ठिकाणी विकसकांना विक्री केलेल्या जागेत जागा मालक मजूर म्हणून राबताना दिसत आहेत.
तालुक्यातील पूर्वजांनी शेकडो एकर जागा आपल्या पुढील पिढीसाठी जतन करून ठेवल्या होत्या. अगदीच गरज भासली तर जागा गहाण ठेवली जात होती आणि अशा जमिनी सोडवून ती परत मिळवली जात होती. मात्र आता त्याच वडिलोपार्जित जागा विकून स्थानिक लोक नवी मुबंई, उलवा, द्रोणागिरी नोड व मुंबईसारख्या ठिकाणी खोली विकत घेत असल्याचे निदर्शनास आले आहे.
गावातील जागा विकल्याने तालुक्यातील अनेकांचे कायम वास्तव्य हे मुंबईत होताना दिसत आहे. गावाला केवळ सणासुदीला तो येताना दिसत आहे. शासनाकडून मिळणार्‍या धान्यामुळे तालुक्यातील शेतीही ओसाड पडण्याच्या मार्गावर आहे. अशा प्रकारे शेती ओसाड ठेऊन करायची काय म्हणून ती विकली जात असून भावी पिढीसाठी चिंतेचे बाब ठरली आहे.
आपल्या पूर्वजांनी पुढच्या अनेक पिढ्यांचा विचार करून जागा विकल्या नाहीत. भरपूर शेती केली. मात्र, जागा विकून त्यातून पैसे कमवू हा हव्यास त्यांनी बाळगला नाही. मात्र, आपल्या डोळ्यांदेखत विकला जात असलेला तालुका पाहून डोळ्यात पाणी येत आहे. यामुळे पुढच्या पिढीला ’गाव ही नाही, नवी मुबंई आणि मुंबई देखील नाही ’ अशी अवस्था होणार आहे.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

best news portal development company in india

READ MORE