दिल्ली दरबारी महेंद्रशेठ घरत यांची तोफ धडाडली!

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी महेंद्रशेठ घरत यांचे केले कौतुक

उरण (विठ्ठल ममताबादे ): “अनेक जण सर्व पदांचा लाभ घेऊन काँग्रेसला सोडून गेलेत, पण आमच्यासारखे प्रामाणिक कार्यकर्ते पक्षाच्या मागे ठाम आहेत, देशात आता गांधीवाद शिल्लक राहील, विरोधकांनी कितीही आटापिटा केला तरी काँग्रेसची विचारधारा मारण्याची ताकद त्यांच्यात नाही,” अशी रायगड जिल्हा काँग्रेसचे  अध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांनी आपल्या भाषणात घणाघाती तोफ डागली. तेव्हा काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी महेंद्रशेठ घरत यांचे अभिनंदन आणि कौतुक केले.

भारतीय काँग्रेसची बैठक दिल्लीतील ‘इंदिरा भवन’ येथे काँग्रेसचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, संघटन महासचिव के. सी. वेणुगोपल, सचिन पायलट यांच्या उपस्थित गुरुवारी (ता.३) दिल्लीत झाली. अनेक वर्षांनंतर पहिल्यांदाच काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांची हायकमांडने दिल्लीत बैठक घेतली.

विशेष म्हणजे या बैठकीला देशभरातील महाराष्ट्र, मुंबई, छत्तीसगड, पंजाब, मध्य प्रदेश, गुजरात येथील ३५० जिल्हाध्यक्ष, अनेक राज्यांचे काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि निरीक्षक उपस्थित होते. या बैठकीत महाराष्ट्रातून विचार व्यक्त करण्याची संधी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आणि आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांना मिळाली.

यावेळी राहुल गांधी म्हणाले, “जिल्हाध्यक्षांना विशेष अधिकार आणि आर्थिक ताकद दिली जाईल, सत्तेचे विकेंद्रीकरण केले जाईल, निवडणुकांचे अधिकार जिल्हाध्यक्षांना दिले जातील. काँग्रेसच्या बळकटीकरणासाठी शक्य ते सर्व प्रयत्न केले जातील.  काँग्रेस तळागाळात रुजविण्याबाबत जिल्हाध्यक्षांची भूमिका आगामी काळात महत्त्वाची असेल.”

“सर्व जाती-धर्मांच्या लोकांना सोबत घेऊन शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केले. त्यांनी सर्व जाती-धर्मांच्या लोकांचा आदर केला, हीच काँग्रेसचीही विचारधारा आहे. गांधीजींनाही हेच अभिप्रेत होते, त्यामुळे काँग्रेसचे विचार लोकांना हवे आहेत. जिल्हाध्यक्षांना अधिकार दिल्याने काँग्रेस अधिक मजबूत होईल, सर्वसामान्यांना फक्त उद्योजकांचा विचार करणारे सरकार नकोय, काँग्रेस हा सर्वसामान्यांचा पक्ष आहे,” असे दमदार विचार व्यक्त करत रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष तथा कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांची तोफ दिल्लीत धडाडली.

या बैठकीला राहुल गांधी, मल्लिकार्जुन खर्गे यांनीही मोलाचे मार्गदर्शन केले.जिल्हाध्यक्षांचे विचार ऐकून घेतले. यावेळी मुंबई काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, मिलिंद पाडगावकर आणि अनेक वरिष्ठ पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

Pelli Poola Jada

READ MORE