रत्नागिरीत ऐतिहासिक आषाढी वारीत हजारो आबालवृद्ध सहभागी
रत्नागिरी : दोन वर्षे कोरोना संकटात गेल्याने त्या पाठोपाठ आलेल्या आषाढी एकादशीनिमित्त रविवारी शहरात काढण्यात आलेल्या पायी वारीत हजारो रत्नागिरीकर मोठ्या उत्साहाने सहभागी झाले. वारीदरम्यान विठुनामात लहान मुलांसह तरूण आणि वृद्ध नागरिकांचा उत्साह अक्षश: ओसंडून वाहत होता. रत्नागिरीच्या एतिहासात अशी वारी रविवारी पहिल्यांचा पहायला मिळाली.
शहरातील मारुती मंदिर ते विठ्ठल मंदिरापर्यंत आयोजित पहिल्या पायी वारीला लहान मुलांसह तरूण आणि वृद्धांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. तीन हजारहून अधिक वारकर्यांनी या वारीत सहभाग घेतला. वारीमध्ये भगवे झेंडे फडकले. वारकर्यांनी भजने, आरत्या, हरिपाठ म्हटला. तसेच महिलांनी फुगड्या घालत उत्सव साजरा केला. पारंपरिक वेशभूषेत आलेल्या सार्या आबालवृद्ध वारकर्यांनी विठूनामाचा गजर केला. रत्नागिरी शहराच्या इतिहासात पहिल्यांदाच अशा वारीचे आयोजन करण्यात आले होते.
हनुमान मंदिर (सडा), विठ्ठल मंदिर देवस्थान समिती यांच्यासमवेत शिवप्रतिष्ठान हिंदस्थान, हिंदू जनजागृती समिती, सनातन संस्था, बजरंग दल, राष्ट्रीय स्यंसेवक संघ, राष्ट्रीय सेवा समिती, हिंदू राष्ट्र सेना, जनजागृती संघ यांच्या पुढाकाराने वारीचे योग्य नियोजन करण्यात आले. यासाठी चार बैठकाही झाल्या होत्या. या नियोजनामुळे रविवारी विराट गर्दी पाहायला मिळाली. लायन्स क्लब, रोटरी क्लब, शिवरूद्र ढोल पथक, आम्ही फक्त शिवभक्त ग्रुप, विविध भजनी मंडळे, इस्कॉन, भंडारी समाज इतर सर्व ज्ञाती संस्था, महिला मंडळ, वकील संघटना, व्यापारी संघटना यांनीही उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला आणि यथायोग्य मदतही केली.
विविध शाळांतील विद्यार्थीही वारीत सहभागी झाल्याचे पाहायला मिळाले. विशेषतः महिला वारकर्यांची गर्दी जास्त प्रमाणात होती. या वारीत जिल्ह्यातील वारकरी संप्रदायातील अनेक वारकरी सहभागी झाल्यामुळे त्यांच्या भक्तिरसाची अनुभूती याचिदेही याचीडोळा अनुभवता आली. एकत्रित असलेली हिंदु शक्ती आणि सामाजिक समतेचे दर्शन या वेळी घडले. वारीमध्ये पालखी, विठुरायाची प्रतिमा यासह भगवे ध्वज फडकत होते.
सकाळी साडेसहा-सातच्या सुमारास मारुती मंदिर येथून टाळ मृदुंगाच्या साथीने आणि मुखाने विठुनामाचा गजर करत, भजने म्हणत वारी निघाली. सकाळी 9 वाजण्याच्या दरम्यान वारी विठ्ठल मंदिरात पोहोचली. तेथे सर्व वारकर्यांचे स्वागत विठ्ठल मंदिर देवस्थानने केले.









