‘गेल’ कंपनीच्या खनिज पाईपलाईन विरोधात कळंबुसरे येथील शेतकऱ्यांची निदर्शने

उरण दि ९ (विठ्ठल ममताबादे ) : गेल इंडिया लिमिटेड या भारत सरकारच्या उपक्रमातून पैट्रोलियम व खनिज पाईप लाईन करण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या पाईप लाईन शेती क्षेत्र लागवडीयोग्य राहणार नाही असा आक्षेप घेत कळंबुसरे येथील शेतकऱ्यांनी रविवारी सकाळी निदर्शने केल

रायगड जिल्ह्यातील उरण, पनवेल, पेण व अलिबाग तालुक्यातील  गावातील गेल इंडिया लिमिटेड या भारत सरकारच्या उपक्रमातून पैट्रोलियम व खनिज पाईपलाईन  कायदा 1962 मधील तरतुदीनुसार संबंधित गावातील शेतकऱ्यांच्या जमिनीमधून गेल इंडिया कंपनीची पाईप लाईन जात आहे. सदर कायदयातील कलम 3 पोट कलम 1 मधील तरतुदीनुसार नोटीसा कार्यालयामार्फत बाधित शेतक-यांना बजावण्याची कार्यवाही ही चालू करण्यात आली आहे.

शेतजमीनीतुन पाईपलाईन टाकल्यास आजुबाजूचे क्षेत्र देखील लागवडीयोग्य राहणार नाही. शेतक-यांवर भविष्यात उपासमारीची वेळ येणार आहे म्हणुन सदर प्रकल्पास कळंबुसरे शेतक-यांनी एकत्र येत या प्रकल्पला (उपक्रमाला )विरोध दर्शविण्यासाठी रविवार दिनांक 09 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी 10 वाजता मोठी जुई वाडा येथे संघटित होऊन विरोध दर्शवीला.शेतकर्‍यांच्या म्हणण्यानुसार सदर मिळकतीतून देखील कंपनीने प्रोपेन वाहून नेणारी पाईपलाईन टाकल्यास आम्हास पिक घेणे अशक्य होऊन आमचे उपजिविकेचे साधनच नष्ट होणार आहे. त्याशिवाय भविष्यात सदर मिळकतीत आम्हास कोणताही इतर व्यवसाय,उपक्रम करता येणार नाही. त्याचप्रमाणे सदरच्या मिळकती हया इतर कोणत्याही प्रकल्पाकरीता संपादीत करणे शक्य होणार नाही.त्यामुळे आम्हास सदर मिळकतीचे मोबदल्यात भविष्यात निर्माण होणारे प्रकल्प अथवा इतर उपक्रमातून मिळणारे फायदे यापासून सुध्दा वंचित रहावे लागेल. सदर मिळकतीतून आम्हास होणारे फायदे गेल कंपनी कडून अस्तित्वात येण्यापूर्वीच नाहीसे होतील. त्यामुळे सदर मिळकतीतून गेल कंपनीने प्रोपेन पाईपलाईन टाकल्यास सदरच्या मिळकती हया नापिक होऊन शेतकऱ्यांचे उपजिविकेचे साधन गेल कंपनीकडून नष्ट होत असल्याने भविष्यात आमचेवर वायुगळती सारखे प्रकार झाल्यास आमच्या जीविताला धोका निर्माण होणार आहे. याअगोदरही लगतचे क्षेत्रामधुन एल पी जी पाईपलाईन गेलेली असल्याने त्यामध्ये बरेच क्षेत्र संपादीत झालेले आहे. सदर संपादीत क्षेत्राची नुकसान भरपाई प्रकल्पग्रस्त शेतक-यांना अदयापही मिळालेली नाही.त्यामुळे गेल कंपनीच्या माध्यमातून होवु घातलेल्या प्रकल्पास आमचा सक्त विरोध आहे, असे उपस्थित शेतकऱ्यांनी सांगितले.सध्या येणा-या पाईपलाईन व्दारे आणखी क्षेत्र नापिक होवुन शेतक-यांस त्यांचे उपजिविकेचे साधन असलेले भाताचे तसेच दुबार पिकाचे उत्पन्न घेता येणार नाही. त्यामुळे शेतक-यांवर भविष्यात उपासमारीची वेळ येणार आहे, असा शेतकऱ्यांचा आक्षेप आहे.

तसेच सदर शेतजमीनीतुन पाईपलाईन टाकल्यास आजुबाजूचे क्षेत्र देखील लागवडीयोग्य राहणार नाही. म्हणुन सदर प्रकल्पास आम्हा शेतक-यांचा सक्त विरोध आहे, असे प्रकल्पग्रस्त शेतकरी नंदकुमार तांडेल यांनी सांगितले.यावेळी कृष्णा तांडेल, राजेश पाटील, सुनिल केणी, रत्नाकर राऊत, विशाल पाटील, ज्ञानेश्वर पाटील, सुरेश भेंडे, रुपेश पाटील  यांच्यासह बाधित शेतकरी उपस्थित होते. पुढील रूपरेषा ठरविण्यासाठी लवकरच एका बैठकीचे आयोजन करण्यात येणार आहे.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE