रत्नागिरी : थुंकिमुक्त गाव अभियाना अंतर्गत डोंबिवली वुमन्स वेल्फर सोसायटी, नया सवेरा आणि बी. बी. सी. यांच्यामार्फत ग्रामपंचायत खरवते येथे पाणी पिण्यासाठी स्पिट बेसिनची सोय करण्यात आली आहे.
डोंबिवली वुमेन्स वेल्फेअर सोसायटीच्या अध्यक्षा डॉ. स्वाती गाडगिळ व ट्रेझरर सौ. सुनीता नेहेते यांच्या प्रयत्नाने खरवते ग्रामपंचायतीला 300 लिटरची पाण्याची ट्रिपल लेयर टाकी, स्टीलचे बेसिन, लोखंडी स्टँड्, ग्लास , ड्रेनेज पाईप, इनपुट आणि आऊटपुट पाईपलाईनची सोय असलेले स्पिट बेसिन युनिट देण्यात आले आहे. गावातील लोकांना चांगले शुद्ध पाणी पिण्यासाठी मिळावे तसेच इतरत्र न थुंकता बेसिनमध्ये थुंकण्याची सवय लागावी या उदात्त हेतूने या संस्थे मार्फत हे युनिट बसविण्यात आले आहे.
या उपक्रमाचे उद्घाटन २ ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी जयंती निमित्त करण्यात आले.
या प्रसंगी खरवते गावचे सरपंच श्री. संजय सकपाळ, ग्रुप ग्रामपंचायतीचे माजी सरपंच श्री तुफिल पटेल, खरवते गावचे उपसरपंच श्री चंद्रकांत मांडवकर, ग्रामपंचायत सदस्या श्रीमती स्वाती मांडवकर , गावातील ग्रामस्थ श्रीमती वनिता मांडवकर, साजीता चौगुले, प्रभावती कुवार, सीताबाई चौगुले, विनया गुरव, असावरी चौगुले, शितल मांडवकर, श्री प्रसाद माटल आदी मान्यवर उपस्थित होते.
खरवते ग्रामपंचायतीच्या आवारामध्ये पिण्याच्या पाण्याची तसेच थुंकण्यासाठी बेसिनची सोय उपलब्ध करून दिल्याबद्दल ग्रामपंचायत खरवते आणि गावातील ग्रामस्थ यांनी डोंबिवली वूमन्स वेल्फेअर सोसायटीचे यावेळी आभार व्यक्त केले.
खरवते गावाबरोबरच डोंबिवली वुमेन्स वेल्फेअर सोसायटीने ग्रामपंचायत बसणी, ग्रामपंचायत पिरंदवणे, ग्रुप ग्रामपंचायत कोतवडे या ठिकाणी सुद्धा अशाच प्रकारच्या युनिटची सोय करून दिली आहे.
















