मुंबई, दि. ११ : शिक्षणक्षेत्र हे केवळ विद्यार्थ्यांची फॅक्टरी न बनता आपला देश शिक्षण क्षेत्रात जागतिक पातळीवर अग्रस्थानी राहण्याच्या दिशेने शासन प्रयत्न करीत असल्याचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले. यासाठी विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता त्यांना कौशल्य आणि तंत्रज्ञान आधारित शिक्षण देण्यात येत असल्याचे ते म्हणाले.
‘टाइम टू ग्रो’ मीडिया आणि राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमाने हॉटेल ट्रायडेंट येथे आयोजित शैक्षणिक परिषदेत मंत्री श्री.केसरकर बोलत होते. शिक्षण विभागाचे सचिव रणजितसिंह देओल, महिला व बाल विकास आयुक्त आर.विमला, टाइम टू ग्रो मीडियाचे संस्थापक मनमीत खुराना आणि शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ यावेळी उपस्थित होते.
मंत्री श्री.केसरकर म्हणाले की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील नवीन शैक्षणिक धोरण भविष्यकाळातील एक सुवर्णसंधी आहे. मातृभाषेतून दिले गेलेले शिक्षण अधिक परिणामकारक ठरते यादृष्टीने नवीन शैक्षणिक धोरणात विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. राज्यात एक लाखांपेक्षा अधिक शाळा असून ग्रामीण आणि दुर्गम भागातील शाळांमध्येही शिक्षणाची सोय सुलभतेने उपलब्ध होण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यावर भर दिला जात आहे. विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी पुस्तकांमध्ये सरावासाठी कोरी पाने जोडण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.















