कंत्राटी वीज कामगारांवरील अन्याय विरोधात २८ पासून बेमुदत उपोषण

महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघातर्फे उपोषणाचा इशाराl

उरण, (विठ्ठल ममताबादे ): वीज वितरणाच्या सर्कल वाशी अंतर्गत एकूण 512 कंत्राटी कामगार कार्यरत आहेत. तर संपूर्ण महाराष्ट्रात 40,000 हुन अधिक कंत्राटी वीज कर्मचारी कार्यरत आहेत. वाशी सर्कलमधील कर्मचाऱ्यांकडून विजेचे काम करून घेण्याचे कंत्राट ऑल सर्व्हिसेस ग्लोबल प्रा. लि., कुसुम मसाला जवळ, गोरेगाव (पूर्व ) या एजन्सीला (कंपनीला ) देण्यात आले. ही कंपनी कंत्राटी वीज कर्मचाऱ्यांचे पगार करत असते.या एजन्सी (कंपनी)च्या मार्गदर्शनाखाली कंत्राटी कामगार कार्यरत आहेत. पण गेली अनेक वर्षापासून सदर एजन्सी (कंपनी )कंत्राटी कामगारावर वेगवेगळे अन्याय करत असून यामुळे कंत्राटी कामगारांवर मोठा अन्याय होत आहे त्यामुळे या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी व कंत्राटी कर्मचाऱ्यांचे न्याय व हक्क त्यांना मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघातर्फे सोमवार दि 28 /11/2022 पासून कामगार उपायुक्त रायगड, खांदा कॉलनी, नवी मुंबई यांच्या कार्यालया समोर बेमुदत उपोषण करण्यात येणार असल्याची माहिती उरण मध्ये कंत्राटी कामगार म्हणून कार्यरत असलेले महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाचे रायगड जिल्हा सचिव कमाल खान यांनी दिली.

सविस्तर वृत्त असे की ऑल सर्व्हिसेस ग्लोबल प्रा लि. या एजेन्सी मार्फत कंत्राटी कामगांराना वेळोवेळी पैशाची मागणी केली जाते. व पैसे न देणाऱ्या कामगारांना कामावरून काढून टाकण्याच्या धमकी देण्यात येते तसेच मुद्दामून कामगारांना वेळेत पगार दिला जात नाही. कामगारांचा पगार मुदामून अडवून ठेवून पैशाची मागणी केली जाते. जोपर्यंत पैसे देत नाहीत तोपर्यंत पगार देणार नाही असा भ्रष्ट व्यवहार सदर एजेन्सी कडून होत आहे. याबाबत कामगारांनी या अन्याया विरोधात आवाज उठविला असता त्यांचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न सदर एजेन्सी कडून होत आहे.कामावरून काढून टाकण्याच्या धमकीने कंत्राटी (बाह्य स्रोत) कर्मचा-यांमध्ये असंतोष व असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. याचा परिणाम महावितरणा च्या शाखा व उपविभागीय कार्यालयामधील दैनंदिन कामकाजावर होत आहे.

या अन्याया बाबत कंत्राटी कामगारांनी लोकशाही मार्गाने, शांततेच्या मार्गाने अनेकदा पत्रव्यवहार केला. मात्र सर्व समस्या आहे तशाच आहेत. कंत्राटी कामगारांच्या समस्यांची कोणीही दखल घेत नसल्याने कंत्राटी कामगारांनी शेवटी बेमुदत उपोषणाचे हत्यार उपसले आहे. या आंदोलनात सर्व कंत्राटी कामगारांनी सहभागी असे आवाहन महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाचे अध्यक्ष निलेश खरात, सरचिणीस सचिन मेंगाळे, कार्याध्यक्ष – उमेश आणेराव, संघटन मंत्री राहूल बोडके, कोषाध्यक्ष – सागर पवार यांनी केले आहे.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE