रत्नागिरी दि. ३ : दिव्यांग व्यक्तींबाबत शासनातील प्रत्येकाने संवेदनशील राहून काम करावे असे आवाहन उद्योग मंत्री तथा रत्नागिरी व रायगडचे पालकमंत्री उदय सामंत यांनी आज येथे केले.
जिल्हा परिषद येथे स्व. श्यामराव पेजे सभागृहात आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात पालकमंत्री बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी किर्तीकिरण पूजार,अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षित यादव, प्र. जिल्हाधिकारी शुभांगी साठे, प्रकल्प संचालक नंदिनी घाणेकर आदि उपस्थित होते.
सामंत म्हणाले देशातील पहिले दिव्यांगाचे मंत्रालय महाराष्ट्रात सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला असून या माध्यमातून अनेक सुविधा या घटकाला मिळणार आहेत. दिव्यांगाच्या अडीअडचणी सरकार समजून घेत असून सरकार आपल्या पाठीशी आहे असे ते म्हणाले.
















