गुहागर तालुक्यातील चिखली येथील जागरूक तरुणाचे कौतुक
गुहागर : निवडणुकीत मतदान हक्क बजावण्याचे महत्त्व एका तरुणाने बोहल्यावर चढण्याआधी अधोरेखित केले. रविवारी लग्न मंडपात बोहल्यावर चढण्याआधी त्याने ग्रामपंचायत निवडणुकीतील आपला मतदानाचा हक्क बजावला. गुहागर तालुक्यातील चिखली येथील हा तरुण आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात 163 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी मतदान प्रक्रिया राबवण्यात आली. लोकशाही बळकट करण्यासाठी मतदानाचा अधिकार बजावण्याची गरज लक्षात घेऊन आज रविवारीच लग्न असलेला हा तरुण मतदानासाठी चक्क मुंडावळ्या बांधलेल्या स्थितीत गावातील मतदान केंद्रावर पोहोचला. मतदान केंद्रावरील कर्मचाऱ्यांनाही त्याचे कौतुक वाटले.
चिखली येथील अभिषेक गोधळे असे या नववर तरुणाचे नाव आहे. घरासमोरील लग्न मंडपात लग्नाची धामधूम सुरू असतानाच निलेशने आपला मतदानाचा हक्क बजावल्याने लोकशाहीतील निवडणूक प्रक्रियेविषयी त्याच्या जागरुखतेचे कौतुक होत आहे.















