खेडमधील मोरवंडे बोरज येथे कोकण स्वयंपूर्णतेकडून स्वयंसिद्धतेकडे विषयावर राष्ट्रीय परिसंवाद
खेड : जागतिकीकरणानंतरच्या कालखंडात भौतिक प्रगतीच्या आधारे पर्यटनाकडे वळलेला माणूस एकविसाव्या शतकात कोकणात स्थिरावल्याचे चित्र आहे. कोकणात पर्यटन व्यवसाय जसजसा वाढेल तसतसे इथल्या प्रकृतीचे शोषणही वाढत जाईल, अशी भिती आहे. दुसरीकडे पर्यटन व्यवसायाच्या मुळाशी कोकणाचे प्राकृतिक सौंदर्य आहे. त्यामुळे ‘पर्यटन’ माध्यमातून स्वयंपूर्ण होऊ पाहणाऱ्या कोकणभूमीला स्वयंसिद्धतेकडे नेताना कोकणच्या प्राकृतिक सौंदर्याची कठोर काळजी घेणाऱ्या ‘पर्यटन नियामक प्राधिकरण’ची नितांत आवश्यकता असणार असल्याचे प्रतिपादन लेखक आणि पर्यटन-पर्यावरण क्षेत्रातील कार्यकर्ते धीरज वाटेकर यांनी केले.

मोरवंडे-बोरज (खेड) येथील ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळाच्या ज्ञानदीप विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाने आयोजित केलेल्या (शनिवार, दि. २१) ‘कोकण स्वयंपूर्णतेकडून स्वयंसिद्धतेकडे’ या विषयावरील राष्ट्रीय परिषदेत ‘अपरिचित कोकणची सफर’ या विषयावरील दृकश्राव्य सादरीकरणादरम्यान वाटेकर बोलत होते.
‘कोकण स्वयंपूर्णतेकडून स्वयंसिद्धतेकडे’ या विषयावरील राष्ट्रीय परिषदेला निमंत्रित केल्याबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य आणि परिषदेचे निमंत्रक डॉ. विजय कुलकर्णी आणि डॉ. तात्यासाहेब नातू कला व वरिष्ठ वाणिज्य महाविद्यालय मार्गताम्हानेचे प्रा. विकास मेहंदळे यांना वाटेकर यांनी धन्यवाद दिले.

स्वतंत्र ‘कोकण विकास प्राधिकरण’ स्थापन करण्याचा विचार होत असताना पर्यावरणासारख्या नाजूक विषयाकडे काळजीपूर्वक पाहिले जायला हवे आहे. पर्यटन राज्य असलेल्या केरळनेही ‘जबाबदार पर्यटन’ (रिस्पॉन्सिबल टुरिझम) संकल्पनेसह ‘पर्यटन नियामक प्राधिकरण’ स्थापन केले आहे. ‘पर्यटन नियामक प्राधिकरण’ म्हणून कार्यरत होताना आपल्याला संपूर्ण कोकण भूमीतील शाश्वत पर्यटनासाठी पर्यटन सेवांचे नियमन आणि मार्गदर्शक तत्त्वे तयार करावी लागतील. कोकण पर्यटन क्षेत्रातील व्यावसायिकांसाठी आचारसंहिता विकसित करून त्याची अंमलबजावणी करावी लागेल. उपलब्ध नैसर्गिक संपन्नता सांभाळून कोकण पर्यटन क्षेत्रात शाश्वत पर्यटनासाठी अनुकूल वातावरण विकसित करावे लागेल त्याचा प्रचार करावा लागेल असे वाटेकर म्हणाले.














