आचरा समुद्रकिनारी कासवमित्रांचा अनोखा जन्मोत्सव सोहळा
मालवण : आचरा समुद्रकिनारी कासवमित्रांनी ऑलिव्ह रिडले जातीच्या कासवाच्या पिल्लांना समुद्रात सोडले. आचरा पिरावाडी येथील समुद्र किनाऱ्यावर 2 महिन्यापूर्वी ऑलिव्ह रिडले कासवांची अंडी सुर्यकांत आबा धुरी यांना मिळाली. त्यानंतर वनविभाग अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यावरणप्रेमी धुरी यांनी सरकारी नियमाप्रमाणे कासवांच्या अंड्यांचे संवर्धन केले होते. ५१ दिवसांनी ही कासवाची ७५ पिल्ली अंड्यांमधून बाहेर पडण्यास सुरुवात झाली होती. दरम्यान, अशा उपक्रमांमधून कोकणात पर्यावरणाबाबत दाखवली जात असलेली जागृती पर्यावरण प्रेमींसाठी सुखद आहे.
कसवाची अंडी वनविभागाच्या देखरेखीखाली दोन महिन्यांपूर्वी समुद्र किनारी संरक्षित करुन ठेवण्यात आली होती.

काही दिवसांपूर्वीच कासवांचे गाव वेळास तसेच गुहागरच्या समुद्रकिनारी देखील किनाऱ्यावरील वाळूत संवर्धित केलेले अंड्यांमधून जन्मलेली पिल्ले समुद्रात सोडण्यात आली होती. कासव पिल्लांचा हा जन्मोत्सव सोहळा अनेक पर्यटकांनी आपल्या कॅमेरात बंदिस्त केला आहे. कोकणच्या किनारपट्टीवर नागरिकांकडून दाखवली जात असलेली जागृती पर्यावरण प्रेमी नागरिकांसाठी सुखद धक्का देणारी ठरली आहे. कोकणच्या किनारपट्टीवर राबविल्या जात असल्याने अशा उपक्रमामुळे कोकणातील वेळास या गावाला ‘कासवांचे गाव’ म्हणून नवी ओळख मिळाली आहे.














