विजय भोईर यांची रेल्वे मंत्रालयकडे मागणी
उरण दि 13(विठ्ठल ममताबादे ) : नेरूळ-उरण पोर्ट लाईनवरून उरण (नवी मुंबई) येथे नव्याने रेल्वे सेवा सुरु होत आहे. त्यामुळे उरण तालुक्याचा विकास झपाट्याने होणार आहे व उरण येथून नवी मुंबई, मुंबई येथे प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सुद्धा त्याचा मोठया प्रमाणावर फायदा होणार आहे. उरण तालुक्यातील रेल्वे स्टेशनला केंद्रीय रेल्वे मंत्रालयाकडून रांजणपाडा, न्हावा शेवा, द्रोणागिरी ही नावे देण्यात आली आहेत. या मार्गावर रेल्वे सेवा सुरु होत आहे. ज्या ठिकाणी रेल्वे स्थानक आहेत त्या ठिकाणी जे गाव आहे. व त्या गावांनी आपल्या जमिनी शासनाला विकासासाठी कवडीमोल भावाने दिलेल्या आहेत. त्या रेल्वे स्थानकास तेथील महसुली गावाचे नाव देणे क्रमप्राप्त असतानाही रेल्वे प्रशासनाकडून जे तेथे गाव अस्तित्वात नाही किंवा त्यांचा ठाव ठिकाणाही नाही अशी नावे रेल्वे स्टेशनला देणे हे चुकीचे धोरण केंद्रीय रेल्वे मंत्रालयाकडून झालेले आहे. या बाबत स्थानिक जनतेमध्ये तीव्र नाराजी असून सदर नाराजीचा उद्रेक होण्याची दाट शक्यता आहे.
धुतुम, नवघर व बोकडविरा या गावातील ग्रामस्थांचा रेल्वे मंत्रालयाकडून आलेल्या स्थानकाच्या नावाबाबत पूर्णपणे विरोध आहे. तरी ग्रामस्थांच्या मागणी प्रमाणे
1) धुतुम ग्रामपंचायत महसूल क्षेत्रात असणारे रांजणपाडा रेल्वे स्थानकाचे नाव धुतुम रेल्वे स्थानक करण्यात यावे.
2) नवघर ग्रामपंचायत महसूल क्षेत्रात असणारे न्हावा शेवा रेल्वे स्थानकास नवघर रेल्वे स्थानक हे नाव देण्यात यावे.
3) बोकडविरा ग्रामपंचायत महसूल क्षेत्रात असणारे द्रोणागिरी रेल्वे स्थानकास बोकडविरा रेल्वे स्थानक हे नाव देण्यात यावे. या रास्त मागणीचा रेल्वे मंत्रालयाने सहानुभूतीने विचार करावा व वरील रेल्वे स्थानकांचे नामकरण करण्यात यावे अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य विजय भोईर यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव, रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे, आमदार महेश बालदी,रायगड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी योगेश म्हसे आदी ठिकाणी पत्रव्यवहार करून केली आहे.
सध्या उरण तालुक्यात रेल्वेची कामे प्रगतीपथावर असून काही दिवसात रेल्वे सुरु होण्याची दाट शक्यता आहे.जनते मध्ये रेल्वे सुरु होणार असल्याने आनंदाचे वातावरण आहे.मात्र रेल्वे स्टेशनला त्या त्या महसूली गावांची नावे न दिल्याने जनतेमध्ये प्रचंड नाराजी आहे.असंतोष आहे.रेल्वे स्टेशनला महसूली गावांची नाव देण्याबाबत उरणचे विद्यमान आमदार महेश बालदी यांनीही विधानसभेत मुद्दा उपस्थित केला होता.

या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद सदस्य विजय भोईर यांनी जनतेची महत्वाची समस्या लक्षात घेउन महसूली गावांची नावे त्या त्या रेल्वे स्टेशनला देण्यात यावे, अशी महत्वाची मागणी केली आहे. आमदार महेश बालदी यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार महेश बालदी, विजय भोईर व त्यांचे शिष्ट मंडळ लवकरच केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव, रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे यांची भेट घेउन सदर समस्या सोडविण्याची मागणी करणार आहेत.
