पंतप्रधान नरेंद्र मोदी एकाचवेळी पाच वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवणार असल्याचे वृत्त
रत्नागिरी : ओडिशामधील बालासोरमध्ये २ जून रोजी रेल्वे झालेल्या भीषण रेल्वे अपघातामुळं मडगाव-मुंबई वंदे भारत एक्स्प्रेसची सेवा लांबणीवर पडली होती. या घटनेनंतर मडगावमध्ये उद्घाटन न करताच मुंबईला वंदे भारत एक्सप्रेस जवळपास पंधरा दिवस यार्डातच उभी आहे. कोकण रेल्वे मार्गावर ती कधी सुरू होणार, याबाबत उत्सुकता असतानाच पुढील दहा-बारा दिवसात ती यार्डातून बाहेर निघण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. दिल्लीतील इंग्रजी वृत्तपत्रांनी दिलेल्या वृत्तानुसार दिनांक 26 जून रोजी देशभरातील एकूण पाच वंदे भारत एक्सप्रेसला पंतप्रधान हिरवा झेंडा दाखवणार आहेत. त्यामध्ये प्राधान्याने मुंबई मडगाव वंदे भारत एक्सप्रेस चा समावेश आहे, असे म्हटले आहे.
कोकण रेल्वे मार्गावरील वंदे भारत एक्सप्रेसचे दि. 3 जून रोजी उद्घाटन झाल्यानंतर ५ जूनपासून नियमितपणे सुरु होणार होती. मात्र, ओडिशामधील रेल्वे अपघातामुळे वंदे भारत एक्सप्रेसचा उद्घाटनाचा कार्यक्रमच रद्द झाला होता. तेव्हापासून वंदे भारत एक्सप्रेस मुंबईतील यार्डमध्ये उभी आहे. आता २६ जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी एकाच दिवशी पाच एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवतील अशी माहिती मिळाली आहे. यासाठी नरेंद्र मोदी भोपाळमध्ये उपस्थित राहणार आहेत,
गेल्या जवळपास पंधरा दिवसांच्या प्रतीक्षेनंतर मडगाव-मुंबई सीएसएमटी वंदे भारत २६ जूनपासून सुरु होईल, असे संकेत मिळाले आहे. या गाडीला रत्नागिरी जिल्ह्यात रत्नागिरी व खेड येथे थांबा देण्यात आला आहे.
ही गाडी मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस येथून सकाळी ५.३५ वाजता सुटेल. ठाणे ६.०५, पनवेल ६.४०, खेड ८.४०, रत्नागिरी १०.००, मडगाव दुपारी १.२५ अशा तिच्या वेळा असतील. मडगाव येथून वंदे भारत एक्सप्रेस दुपारी २.३५ वाजता सुटेल. परतीच्या प्रवासात रत्नागिरीतील तिची वेळ ५.३५ आहे. मुंबईतील छत्रपती शिवाजी टर्मिनसला ही गाडी रात्री १०.३५ वाजता पोहोचेल.
मुंबई मडगाव वंदे भारत एक्स्प्रेस ही आठवड्यातून सहा दिवस धावणार आहे. ही सेवा शुक्रवारी बंद असेल. कोकण रेल्वेच्या मान्सून वेळापत्रकाच्या कालावधीत ही एक्स्प्रेस तीन दिवस सुरु असेल की त्याही काळात ती (देखभालीचा दिवस वगळून) रोज धावेल याची निश्चित माहिती अजून तरी उपलब्ध झाली नाही. कदाचित ती देखभालीचा दिवस वगळता रोजच धावेल असेही बोलले जात आहे. कोकण रेल्वे मार्गावर मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून वंदे भारत एक्स्प्रेस मडगावसाठी सुटेल. दादर, ठाणे, पनवेल, रत्नागिरी, कणकणवली, थिविम या स्थानकांवर थांबे घेणार आहे.














