रत्नागिरी : उद्घाटन होऊन अवघे पाच दिवस उलटले नाहीत तोच कोकण रेल्वे मार्गावरील वंदे भारत एक्सप्रेस प्रवासी, पर्यटकांसह रेल्वे प्रशासनाचाही उत्साह वाढवताना दिसत आहे. भर पावसातही वंदे भारत एक्सप्रेसच्या आरक्षणाला उत्तम प्रतिसाद लाभत आहे. याचमुळे उद्या दि 3 जुलै रोजी मुंबई सीएसएमटी ते मडगाव मार्गावर धावणाऱ्या या हाय स्पीड ट्रेनसाठी प्रतीक्षा यादीवरील आरक्षण सुरू झाले आहे.
गणेशोत्सवातील सहा दिवसांचे वंदे भारत एक्सप्रेसचे आरक्षण फुल्ल!
मुंबई मडगाव मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस सुरू होऊन अजून आठवडाही झाला नाही. अशी स्थिती असतानाच या गाडीचे गणेशोत्सवातील दिनांक 15, 18 20, 22 तसेच 23 आणि 26 सप्टेंबर 2023 या तारकांचे आरक्षण आधीच फुल्ल झाले आहेत.
गणेशोत्सवात रेल्वेला ८ ऐवजी १६ कोचसह वंदे भारत चालवावी लागणार?
कोकण रेल्वे मार्गावरील वंदे भारत एक्सप्रेसला लाभत असलेला प्रतिसाद लक्षात घेता येत्या गणेशोत्सवात मध्य रेल्वेला ८ ऐवजी १६ डब्यांची वंदे भारत एक्सप्रेस चालवावी लागते की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. मध्य रेल्वेकडे कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या वंदे भरत एक्सप्रेसच्या रेकसह सोलापूर तसेच शिर्डी मार्गावर धावणाऱ्या 16 कोचच्या रेकचा पर्याय उपलब्ध आहे. त्यामुळे गणेशोत्सवात कोकण मार्गावर वाढत्या मागणीचा विचार करून रेकची अदलाबदल करून रेल्वे ८ ऐवजी 16 डब्यांची वंदे भारत एक्सप्रेस चालवण्याचा विचार करू शकते, अशी सुत्रांची माहिती आहे.
हे देखील वाचा : Konkan Railway | गणेशोत्सवात चिपळूणसाठी स्वतंत्र मेमू स्पेशल गाडी धावणार!