रत्नागिरी : गोगटे – जोगळेकर महाविद्यालयात मुंबई विद्यापीठाच्या ५६ व्या आंतर महाविद्यालयीन सांस्कृतिक युवा महोत्सवाचे – २०२३ करण्यात आले आहे.
महाराष्ट्र आणि मुंबई विद्यापीठाच्या सांस्कृतिक विश्वात एक अग्रगण्य महाविद्यालय म्हणून गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचा लौकिक आहे. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक कलाविश्वात महाविद्यालयाचे एक आगळेवेगळे स्थान आहे. सळसळत्या तरुणाईच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी महाविद्यालय कायमच प्रयत्नशील असते. विद्यार्थांना त्यांचे कलागुण सादर करण्याचे हक्काचे व्यासपीठ मिळते ते सांस्कृतिक महोत्सवाच्या माध्यमातून.
या पार्श्वभूमीवर बुधवार, दि. ९ ऑगस्ट, २०२३ रोजी गोगटे जोगळेकर महाविद्यालयात मुंबई विद्यापीठाच्या ५६ व्या आंतरमहाविद्यालयीन सांस्कृतिक युवा महोत्सवाचे – २०२३ करण्यात आले आहे. दक्षिण रत्नागिरी झोन मधून सुमारे १६ महाविद्यालयातील विद्यार्थी या महोत्सवात सहभागी होऊन आपल्या विविध कलागुणांचे सादरीकरण करणार आहेत.
या सांस्कृतिक युवा महोत्सवाचे उद्घाटन दि. ९ ऑगस्ट, २०२३ रोजी सकाळी १०.०० वाजता राधाबाई शेट्ये सभागृहात होणार असून, या उद्घाटन समारंभाला रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे पदाधिकारी, सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहे.
एक दिवस रंगणाऱ्या या तरुणाईच्या सांस्कृतिक महोत्सवात विविध लोकसंस्कृतीचे दर्शन घडविणारे लोकनृत्य, एकांकिका, एकपात्री अभिनय, नृत्य, संगीत, गायन, वादन, वादविवाद, कथाकथन, मातीकाम, रांगोळी अशा जवळजवळ ४० कलाप्रकारातील स्पर्धा होणार असून, विविध कार्यक्रमांची रेलचेल त्यात असणार आहे.
विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव देणाऱ्या आणि नेतृत्व गुणांचा विकास करणाऱ्या या महोत्सवाच्या संयोजनासाठी रत्नागिरी जिल्हा समन्वयक प्रा. डॉ. आनंद आंबेकर यांच्या नेतृत्वाखाली महाविद्यालयातील त्यांचे सहकारी परिश्रम घेत आहे. हा सांस्कृतिक महोत्सव विद्यार्थांसाठी असून, रत्नागिरी एज्युकेशन सोसायटी आणि महाविद्यालयाने घालून दिलेले मूल्ये, शिस्त इ. शी अधिष्ठित राहून रसिक विद्यार्थांनी या महोत्सवाचा आस्वाद घेऊन आपला आनंद द्विगुणीत करावा, असे आवाहन महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. प्रफुल्लदत्त कुलकर्णी यांनी केले आहे.
