धार्मिक कार्यक्रमासाठी मुंबईतून येणारी कार उलटून दोन महिलांचा मृत्यू
देवरुख – रत्नागिरी मार्गावर अपघात ; अन्य दोन जखमी
देवरुख : मुंबईतून धार्मिक कार्यक्रमासाठी येणार्यांच्या कारला देवरूख-रत्नागिरी मार्गावरील वाशी फाटा येथे झालेल्या अपघातात दोन महिलांचा मृत्यू झाला असून दोनजण जखमी झाले आहेत. हा अपघात गुरूवारी रात्रीच्या सुमारास घडला.
प्रथमेश प्रकाश हळदणकर (रा. निवे बुद्रुक पाष्टेवाडी) यांनी दिली आहे. अपघातामध्ये दीपिका दीपक सावंत (50) व भागीरथी दगडू सावंत (85) या दोन महिला ठार झाल्या आहेत. प्रकाश हळदणकर व शुभम दीपक सावंत हे जखमी झाले आहेत. वाशी तर्फे देवरूख येथील निनावी देवी मंदिरात धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी सावंत कुटुंबीय गुरुवारी मुंबईहून आपल्या वाशी गावी येत होते. चालक आपल्या ताब्यातील स्विफ्ट डिझायर कार (एम. एच. 02, सीआर 5241) घेऊन मुंबईहून वाशीच्या दिशेने येत होते. वाशी फाट्यानजीक चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने त्यांची कार गटारात उलटली.
या अपघातामध्ये दीपिका सावंत व भागीरथी सावंत यांचा मृत्यू झाला असून प्रकाश हळदणकर व शुभम सावंत हे जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच देवरुख पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी व पंचनामा केला. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. दीपिका सावंत व भागीरथी सावंत यांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. विच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.
या अपघातप्रकरणी कार चालकावर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बाबत अधिक तपास पोलिस निरीक्षक बाळकृष्ण जाधव करीत आहेत.