लक्ष लक्ष निरांजनांच्या औक्षणाने
जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराजांचा जन्मोत्सव साजरा

नाणीज, दि. २२:- सुंदरगडावर रात्री भाविकांच्या हातातील लक्ष लक्ष निरांजने एकाच वेळीउजळली, त्या एकवटलेल्या प्रकाशात हाताला हात मिळाले. भाविकां समवेत साधुसंतांनी, कुटुंबीयांनी जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज यांचे औक्षण केले. पायी दिंड्यांचे आगमन, रुग्णवाहिकांचे लोकर्पण, हजारो भाविकांनी व रोषणाईने सजलेला सुंदरगड, सातत्याने सुरू असलेला जयघोष, अशा हर्षोल्लासात व भावपूर्ण वातावरणात जगद्गुरूश्रींचा जन्मोत्सव सोहळा काल रात्री उत्साहात साजरा झाला.


रात्री दहा वाजता खऱ्या आर्थाने जन्मोत्सव सोहळा सुरू झाला. यावेळी वे.शा.सं. भालचंद्रशास्त्री शौचे गुरूजी व त्यांच्या सहकार्याने मंत्रघोष सुरू केला. त्यांच्या सुचनेनुसार सारे धार्मिक विधी सुरू होते. भाविकांनी निरांजने बरोबर आणली होती. ती प्रज्वलीत केली. उत्साहात जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज यांचे औक्षण करण्यात आले. संतपीठावर सौभाग्यवती सुप्रियाताई प.पू. कानिफनाथ महाराज, सौ. ओमेशवरीताई, चि. देवयोगी यांनी औक्षण केले. त्यानंतर भाविकांनी एकच जयघोष केला. फटाक्यांची आतषबाजी केली. भजन गात आनंद व्यक्त केला. सारे वातावरण भक्तीने भारून गेले होते.
संतपीठावर यावेळी देशभरातील नामवंत आखाड्यांचे साधूसंत आसनस्थ होते. त्यांनीही जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज यांचे अभिष्टचिंतन केले. त्यांनी औक्षण करून महाराजांचा गौरव केला.


सकाळी नऊ वाजता जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज यांचे सुंदरगडावर सहकुटुंब आगमन झाले. प.पू. कानिफनाथ महाराज, सौ. सुप्रियाताई, सौ. ओमेश्वरीताई नातवंडे, सर्वांनी संतशिरोमणी गजानन महाराज मंदिरात जाऊन देवदेवतांचे दर्शन घेतले. त्यानंतर जगद्गुरूश्री व कानिफनाथ महाराज संतपीठाकडे निघाले. यावेळी भाविकांनी एकच जयघोष केला. सुरूवातीला सुवासिनींनी त्यांचे औक्षण केले. संतपीठावर येताच जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज यांनी हात उंचावून सर्वांना अभिवादन केले. आशीर्वाद दिले. त्यावेळी सारे वातावरण चैतन्यमय झाले. त्यापूर्वी नाथांचे माहेर येथील मंदिरातही त्यांनी दर्शन घेतले.
तत्पूवी सकाळी नाशिक येथून आलेल्या वसुंधरा पायी दिंडीचे स्वागत करण्यात आले. भाविकांसाठी सुंदरगडावर 24 तास महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. दोन दिवस सद्गुरू काडसिद्धेश्वर महाराज रुग्णालयात मोफत सर्वरोग शिबिर सुरू होते. त्याचा लाभ अनेक भाविकांनी घेतला.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE