रत्नागिरी : हिवाळी पर्यटन हंगाम तसेच क्रिसमसमुळे कोकण रेल्वे मार्गावरील गाड्यांना गर्दी होऊ लागल्याने रेल्वेने या मार्गाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी खुशखबर आणली आहे. या मार्गे धावणाऱ्या लांब पल्ल्याच्या चार गाड्यांना जादा डबे जोडून रेल्वेने ही खुशखबर देण्याचा प्रयत्न केला आहे.
हिवाळी पर्यटन हंगामामुळे कोकण रेल्वे मार्गावरील नियमित तसेच विशेष गाड्यांना गर्दी वाढत चालली आहे. याआधी देखील या मार्गावरील विविध गाड्यांना अतिरिक्त डबे जोडण्यात आले आहेत.
कोकण रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार पोरबंदर ते कोचुवेली या मार्गावर धावणाऱ्या गाडीला (20910) दि. 21 डिसेंबर 2023 रोजी च्या फेरीसाठी, कोचुवेली ते पोरबंदर (20909) या मार्गावर जाताना दि. 24 डिसेंबर 2023 रोजी च्या प्रवासासाठी स्लीपर श्रेणीचा
एक अतिरिक्त डबे जोडला जाणार आहे.
याचबरोबर सुरतजवळील उधना ते मंगळूरु (09057) या विशेष ट्रेनला दिनांक 22 डिसेंबर 2023 रोजीच्या फेरीसाठी तर मंगळूरु ते उधना (09058) दरम्यान धावताना दिनांक 23 डिसेंबर 2023 या दिवसाच्या फेरीसाठी दोन अतिरिक्त डबे जोडले जाणार आहेत.
रेल्वेच्या या अतिरिक्त डबे जोडण्याच्या निर्णयामुळे गर्दीमुळे कन्फर्म तिकीट न मिळालेल्या प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. वरील दोन्ही गाड्यांची प्रतीक्षा यादी कमी होण्यास यामुळे मदत होणार आहे.