‘जागर आपल्या संस्कृतीचा’ कार्यक्रमाला महिलांचा उदंड प्रतिसाद
उरण दि २८ (विठ्ठल ममताबादे ) : उरण तालुक्यातील बांधपाडा खोपटे ग्रामपंचायततर्फे आजपर्यंत जनतेच्या कल्याणासाठी विविध योजना, सवलती मोठया प्रमाणात राबविण्यात आल्या. सर्व योजनांची ग्रामपंचायतने अंमलबजावणी सुद्धा केली.महिलांची आर्थिक स्थिती सुधारावी, त्यांचे राहणीमान सुधारावे, महिलांच्या उन्नतीस हातभार लागावा या अनुषंगाने अनेक उपक्रम बांधपाडा खोपटे ग्रामपंचायत मार्फत राबविण्यात आले . महिलांचे मनोरंजन व्हावे. व त्यांच्यातील कलागुणांना वाव मिळावा, विविध कौशल्य त्यांनी आत्मसात करावे, या दृष्टीकोणातून खोपटे ग्रुप ग्रामपंचायत मार्फत महिलांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.त्या सर्वांना महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
हळदीकुंकू समारंभ, महिला सक्षमीकरण कार्यक्रम, महिलांसाठी आरोग्य शिबिर इत्यादी कार्यक्रम मोठ्या संख्येने आयोजित करण्यात आले. आणि यावर्षी प्रथमच महिलांसाठी ‘जागर आपल्या संस्कृतीचा’ या कार्यक्रमा अंतर्गत महिलांना आपल्या दररोजच्या कामातून विरंगुळा मिळावा ह्या उद्दिष्टाने ग्राम पंचायतमार्फत महिलांचे सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. त्यात पारंपरिक नृत्य, गाणी आणि नाटिका यांचे अतिशय उत्तम प्रकारे सादरीकरण करण्यात आले.
या कार्यक्रमात महिलांचे मनोधर्या वाढावे यासाठी सरपंच विशाखा ठाकूर यांनी स्वतः दोन धार्मिक गाण्याच्या नृत्यातून सक्रिय सहभाग घेतला.अशा ह्या आगळ्या वेगळ्या आयोजित केलेल्या कार्यक्रमाबद्दल संपूर्ण पंचक्रोशीतून बांधपाडा खोपटेच्या सरपंच विशाखा प्रशांत ठाकूर, उपसरपंच रितेश ठाकूर,सर्व ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्राम संघांचे अभिनंदन केले आहे.
कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या महिलांचे, ग्रामस्थांचे आणि कार्यक्रमात सहभागी झालेल्या महिलांचे सरपंच विशाखा ठाकूर यांनी आभार मानले.यावेळी सरपंच विशाखा ठाकूर म्हणाल्या की कोणीही आपल्याला, स्वतःला कमी समजण्याची आवश्यकता नाही. खेळ असो वा स्पर्धा त्यात प्रत्येक जण हा विजयी होतोच. एखाद्या उमेदवाराला पहिला नंबर, दुसरा नंबर नाही मिळाला तरी निराश होऊ नका. प्रयत्न कधीच वाया जात नाहीत. आयुष्यात पुढे जाण्यासाठी अथक मेहनत घ्या. कष्ट करा त्यानेच सर्वांची प्रगती होईल. महिलांनी कोणत्याही क्षेत्रात पाठीमागे न राहता सर्वच क्षेत्रात महिलांनी पुढे जावे असे आवाहन सरपंच विशाखा ठाकूर यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे निवेदक चेतन पाटील, रोशन घरत, जीवन डाकी यांनी केले.तर साऊंड सिस्टीम – अक्षय साऊंड सर्व्हिस खोपटे यांचे लाभले.तसेच स्वयंसहायता समूहातील सी आर पी, ग्रामसंघ अध्यक्ष, बँकसखी, आणि सर्व स्वयंसहायता समूह या सर्वांचे सहकार्य या कार्यक्रमाला लाभले.सदर कार्यक्रमाचे पर्यवेक्षण रवि सर, रोहन सर यांनी केले.सदर कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.