- ..तो आला.. त्यांनं विचारलं, ‘पाव्हणं जेवला काय..’ अन् रसिक प्रेक्षकांनी खुर्च्या सोडल्या..
- तुडुंब भरलेल्या क्रीडा संकुलाला अवधूत गुप्तेनं जिंकलं; रंगमंच्यासमोर रसिकांच्या उत्स्फूर्त नृत्यांने कल्ला
रत्नागिरी, दि. १६ : तो येणार.. शेवटच्या दिवशी तो येणार.. याचीच चर्चा गेली चार दिवस रंगली होती. अन् अखेर तो समारोपाला आला. त्यानं नेहमीच्या स्टाईलमध्ये विचारलं, ‘पाव्हणं जेवला काय..’ आणि रसिक प्रेक्षकांनी आपल्या खुर्च्या सोडल्या.. रंगमंच्यासमोर उत्स्फूर्तपणे नृत्य करत एकच कल्ला केला. रसिक प्रेक्षकांनी तुडुंब भरलेल्या प्रमोद महाजन क्रीडा संकुलाला अवधूत गुप्तेंनं आपल्या सादरीकरणानं जिंकलं होतं.
पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय व रत्नागिरी जिल्हा प्रशासनाच्यावतीने येथील प्रमोद महाजन क्रीडा संकुलात अवधूत गुप्ते संगीत रंजनी या कार्यक्रमाने या महोत्सवाची काला सांगता झाली. कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक संजय दराडे यांच्या हस्ते अवधूत गुप्तेंचं स्वागत करण्यात आले. यावेळी अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला कोल्हापूर येथील शिव स्वराज्य मर्दानी आखाड्याच्या मुलांनी शिवकालीन मर्दानी खेळांचे प्रदर्शन करुन उपस्थितांची मने जिंकली. तलवार चालवणे, भाला फिरवणे, दांडपट्टा चालवणे, लाठी फिरवणे, दांडपट्टयाने लिंबू कापणे, लाठी फिरवता फिरवता नारळ फोडणे असे चित्तथरारक प्रदर्शन हलगी, घुमक आणि कैताळ या रण वाद्याच्या निनादात केले. त्यानंतर तोणदे येथील सिध्दीविनायक ग्रुपने पालखी नृत्य सादर करुन वाहवा मिळविली. या नृत्यामध्ये मानवी मनोरा उभा करत, पालखी घेऊन रोमांचकारी नृत्य सादर केले.

कोकणची सुकन्या इशानी पाटणकर हिच्या ‘गं पोरी नवरी आली..’ या गीताने अवधूत गुप्ते संगीत रजनी कार्यक्रमाची सुरुवात झाली. ‘ही गुलाबी हवा..’ अशा अनेक गीताने उत्तरोत्तर कार्यक्रम रंगतदार सुरु असतानाच अखेर ज्याची प्रतिक्षा होती तो अवधूत ‘तुच माझी आई देवा.. तुच माझा बाबा..’ ही गणेश वंदना आपल्या नृत्य कलाकरासह घेवून रंगमंचावर अवतरला. ‘तुझे देख के ए मधुबाला.. बाई बाई मनमोराचा कसा पिसारा फुलला..’ या रिमिक्स गीताने उपस्थितांना भुरळ पाडली. त्याच्या या गीताला उपस्थितांनी कोरसही दिला.

‘कभी गहरें समुंदर की गहराईयाँ..
कभी उँचे पहाडों की उँचाईएयाँ..
तु हे अंबवा की छाया में आया मितवा..
मेरे कणकण में कोंकण समाया मितवा..
कोकणची चेडवा ओ नाखवा
ओ हिच्या घोवाला कोकण दाखवा..’
या गीतामधून कोकणची महती, इथले पर्यटन, इथली समृध्दता आणि त्याच्यामधून बहरत जाणारे प्रेम हा हळुवार धागा पकडत, रसिक प्रेक्षकांच्या अंतर्मनाला स्पर्श सुरेल आवाजाने स्पर्श करुन भान हरपायला लावले.
अशा अनेक गाण्यांनी उपस्थितांना अवधूत गुप्तेंनं बेधूंद केलं आणि बेधूंद,बेहोष झालेले रसिक प्रेक्षक रंगमंच्यासमोरील मोकळ्या जागेत नाचण्यासाठी धावले. शेकडो हातांमध्ये मोबाईल होते. सेल्फीसह अवधूत गुप्तेला बंदिस्त करण्यात हे हात सरसावले होते.
ही जात साली..
‘ही जात साली जात साली जात जाता जाता नाही..
राजा रज वाडा गेलं वजीर नबाब गेलं सुलतान गेलं साहेबी रुबाब गेलं..
मिशीवरलं ताव गेलं.. भलं भलं आलं गेलं… त्याचं नाव गेलं..
गेल्या गेल्या शेंड्या अन् जानव्याच्या गाठी गेल्या.. गेल्या..गेल्या ना..
घटका गेली पळ गेली पाठीपाठी रुढी गेल्या..’
सद्यस्थितीवर भाष्य करणाऱ्या या गीतामधून अवधूत गुप्तेनं मनोरंजनाबरोबर प्रबोधनही केले.
‘जय जय महाराष्ट्र माझा.. गर्जा महाराष्ट्र माझा..’ या गीताने कार्यक्रमाचा समारोप करताना बाल रसिकांचा चमू रंगमंचावर तर, इतर समोर एकच जल्लोष करत होता. कल्ला करत होता..अन् अखेर त्याने तुडुंब भरलेल्या रसिक प्रेक्षकांना जिंकलं होतं.














